ताज्याघडामोडी

कोव्हिशिल्डचा डोस घेतल्यानंतर ४५७ जणांचा, तर कोव्हॅक्सिनचा डोस घेणाऱ्या २० जणांचा मृत्यू

नवी दिल्ली – देशावर ओढावलेल्या कोरोना संकटाविरोधात लढण्यासाठी सध्या देशभरामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. याचदरम्यान सीएनएन न्यूज १८ ने सरकारी माहितीच्या आधारे दिलेल्या आकडेवारीनुसार लसीकरणामुळे आतापर्यंत देशात ४८८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २६ हजार जणांना लस घेतल्यानंतर गंभीर स्वरुपाचे साईड इफेक्ट दिसून आले आहेत.

अशा गंभीर स्वरुपाच्या साईड इफेक्ट्सला वैज्ञानिक भाषेमध्ये अ‍ॅडव्हर्स इव्हेंट फॉलोइंगी इम्यूनायझेशन म्हणजेच एईएफआय असे म्हटले जाते. अशाप्रकारची आकडेवारी लसीकरण मोहीम हाती घेणाऱ्या प्रत्येक देशामध्ये गोळा केली जाते. भविष्यामध्ये लसीकरणाचा दुष्परिणाम कमी प्रमाणात व्हावा, यासाठी ही आकडेवारी गोळा केली जाते. ही आकडेवारी १६ जानेवारी ते ७ जून दरम्यानची आहे. आकडेवारी पाहिल्यास लसीकरणामुळे मृत्यू झालेल्याचे प्रमाणात फारच कमी आहे. देशामध्ये ७ जूनपर्यंत २३ कोटी ५० लाख जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

एईएफआयची एकूण २६ हजार २०० प्रकरणे या कालावधीमध्ये समोर आली आहेत. म्हणजेच टक्केवारीत सांगायचे झाले तर केवळ ०.०१ टक्के लोकांमध्ये लसीचे गंभीर दुष्परिणाम दिसून आले आहेत. आणखीन सोप्या भाषेत समजून सांगायचे झाले तर १४३ दिवसांच्या कालावधीमध्ये लस घेणाऱ्या प्रत्येक १० हजार जणांमागे केवळ एका व्यक्तीमध्ये कोरोना प्रतिबंधक लसींचे गंभीर दुष्परिणाम दिसून आले आहेत. तर लस घेणाऱ्या प्रत्येक १० लाख लोकांमागे दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

आतापर्यंत उपलब्ध असणाऱ्या आकडेवारीनुसार भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या कोव्हिशिल्ड या दोन्ही लसींसाठी एईएफआय टक्केवारी ही केवळ ०.१ टक्के एवढी आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार आकडेवारी पाहिल्यास एईएफआयच्या प्रकरणांची संख्या खूपच कमी असल्यामुळेच लसीकरण करुन घेणे हे अधिक फायद्याचे असल्याचे तज्ज्ञ सांगतात. कोरोनामुळे भारतामध्ये आतापर्यंत तीन लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये सध्या लसीकरण हे एकमेव प्रभावशाली अस्त्र आहे.

सरकारी आकडेवारीनुसार एईएफआयच्या २६ हजार २०० प्रकरणांपैकी दोन टक्के लोकांचा म्हणजेच ४८८ जणांचा मृत्यू झाला आहे. मरण पावणाऱ्यांमध्ये ३०१ पुरुष आणि १७८ महिलांचा समावेश आहे. यापैकी नऊ जण महिला आहेत की पुरुष हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. मरण पावलेल्यांपैकी ४५७ जणांना कोव्हिशिल्डचा डोस देण्यात आला होता. तर कोव्हॅक्सिनचा डोस घेणाऱ्या २० जणांचा मृत्यू झाला आहे. ११ जणांनी नक्की कोणती लस घेतली होती, याची माहिती देण्यात आलेली नाही. देशामध्ये २१ कोटी लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यापैकी कोव्हॅक्सिनची संख्या केवळ दीड कोटी एवढी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *