गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

शिक्षिकेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या; पर्समध्ये सापडली सुसाईड नोट

अहमदनगर : नगर शहरात राहणाऱ्या एका शिक्षिकेने इमामपूर शिवारातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. वंदना रेपाळे असं या शिक्षिकेचं नाव असून त्या धनगवाडी येथील शाळेत नोकरीला होत्या. आजारपणाला कंटाळून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आहे.

नगर-औरंगाबाद महामार्गावर सुनील पांडुरंग टिमकरे हे आपल्या शेतात वीज पंप सुरू करण्यासाठी गेले असता त्यांना तेथे दुर्गंधी आल्याने त्यांनी पाण्यात पाहिले. तेव्हा पाण्यात तरंगताना महिलेचा मृतदेह दिसला. त्यांनी एमआयडीसी पोलिसांशी संपर्क करून या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनेची तात्काळ दखल घेत ते घटनास्थळी दाखल झाले व ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

वंदना रेपाळे या गेल्या चार दिवसापासून बेपत्ता होत्या. याबाबत नगर शहरातील तोफखाना पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आलेली आहे. विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यांच्या पर्समध्ये ही सुसाईड नोट सापडली. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, ‘मला मणक्याचा त्रास असल्याने आत्महत्या केली आहे.’ याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक युवराज आठरे यांनी माहिती दिली आहे.दरम्यान, एका शिक्षिकेनं आजारपणासारख्या कारणातून असं टोकाचं पाऊल उचलल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *