एक अतिशय हादरवणारी घटना नुकतीच समोर आली आहे. पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यात एकाच कुटुंबातील चार सदस्यांचे मृतदेह विकृत अवस्थेत त्यांच्या फ्लॅटमध्ये आढळून आले आहेत. पोलिसांनी रविवारी ही माहिती दिली. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, 52 वर्षीय कापड व्यावसायिक वृंदाबन कर्माकर, त्यांची पत्नी देबश्री कर्माकर वय 40), त्यांची 17 वर्षांची मुलगी देबलीना आणि 8 वर्षांचा मुलगा उत्साह अशी मृतांची नावं आहेत.
बराकपूर पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत खरदह भागातील एमएस मुखर्जी रोडवरील एका बंद अपार्टमेंटमध्ये हे मृतदेह सापडले आहेत. वृंदाबन कर्माकर यांनी प्रथम कुटुंबीयांना विष दिलं आणि नंतर स्वतः आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी सांगितलं की, वृंदाबनचा मृतदेह छताला लटकलेल्या अवस्थेत सापडला होता, तर इतर तीन मृतदेह फ्लॅटमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सापडले होते.
पोलिसांनी सांगितलं की, फ्लॅटमधून एक सुसाईड नोटही सापडली आहे. त्यात वृंदाबन कर्माकर यांनी पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा दावा केला असून ते सहन होत नसल्यानं त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं आहे. अपार्टमेंटमधून दुर्गंधी आल्याने स्थानिक लोकांनी पोलिसांना माहिती दिली. फ्लॅटचा मुख्य प्रवेशद्वार दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे तो तोडावा लागला. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाची पाहणी करून पुरावे गोळा केले. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.