ताज्याघडामोडी

SBI, HDFC, ICICI खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी, 30 जूनला बंद होणार ही सुविधा

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), एचडीएफसी बँक (HDFC), आयसीआयसीआय बँक (ICICI) आणि बँक ऑफ बडोदाच्या (BOB) ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. या बँकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी (Senior Citizen) अधिक व्याजदराची एक विशेष मुदतठेव (Foxed Deposit) योजना दाखल केली होती, ती योजना 30 जून 2021 रोजी बंद होणार आहे. मे 2020 मध्ये या बँकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी एक खास योजना आणली होती. ठराविक कालावधीसाठी असलेल्या मुदत ठेव योजनेत ज्येष्ठ नागरिकांसाठी लागू असलेल्या व्याजदरापेक्षा अर्ध्या टक्क्याहून अधिक व्याज दर देण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसाधारण ग्राहकाला मिळणाऱ्या व्याजदरापेक्षा एक टक्का अधिक व्याज ज्येष्ठ नागरिकांना मिळते.

या योजनेची अंतिम मुदत 31 मार्च होती. ती 30 जून 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे. आता ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर फक्त हा महिना बाकी आहे.

स्टेट बँक : सध्या स्टेट बँक (SBI) पाच वर्षांच्या मुदतीसाठी सामान्य नागरिकांना 5.4 टक्के व्याज देते. मात्र एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने विशेष मुदतठेव योजनेअंतर्गत गुंतवणूक केली तर त्याला 6.20 टक्के दराने व्याज मिळते. ही योजना 5 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी आहे.

एचडीएफसी बँक : एचडीएफसी बँक (HDFC) ज्येष्ठ नागरिकांसाठी आणलेल्या विशेष मुदतठेव योजनेवर सर्वसाधारण व्याजदरापेक्षा पाऊण टक्का (0.75)अधिक व्याज देते. एचडीएफसी बँकेच्या सीनियर सिटीझन केअर एफडीअंतर्गत (Senior Citizen Care FD) एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने ठेव ठेवल्यास त्याला 6.25 टक्के व्याजदर मिळेल.

बँक ऑफ बडोदा (BOB): बँक ऑफ बडोदाच्या विशेष मुदतठेव योजनेअंतर्गत 5 वर्ष ते 10 वर्षांपर्यंतच्या मुदतीसाठी ज्येष्ठ नागरिकांना 6.25 टक्के व्याजदर मिळेल.

आयसीआयसीआय बँक : आयसीआयसीआय बँकेनं (ICICI) ज्येष्ठ नागरिकांसाठी आयसीआयसीआय बँक गोल्डन इयर्स (Golden Years Scheme) ही विशेष योजना सुरू केली आहे. या योजनेत बँक ज्येष्ठ नागरिकांना 0.80 टक्के अधिक व्याज देत आहे. आयसीआयसीआय बँक गोल्डन ईयर्स योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना वार्षिक 6.30 टक्के व्याज दर मिळतो.

सध्याच्या काळात व्याजदर कमी होत असताना या बँकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी आणलेल्या या विशेष योजनांमुळे त्यांना चांगले व्याज मिळणार आहे. व्याजाच्या उत्पन्नावर अवलंबून असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या या योजनेची मुदत वाढवण्यात आल्यानं याआधी गुंतवणूक करू न शकलेल्या अनेक ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ घेण्याची संधी निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *