राज्यात पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, औरंगाबाद अशा शहरांमधील कोरोनाची स्थिती अत्यंत विदारक बनत चालली आहे. अशावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाकडून कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र, या निर्बंधांचा फटका छोटे व्यापारी आणि व्यवसायिकांना बसताना पाहायला मिळतोय. अशावेळी व्यापारी वर्गाकडून राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा देण्यात आलाय. (Pune trade unions warn state government over lockdown)
पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचा इशारा
पुणे शहरासह जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना या लॉकडाऊन सदृश्य परिस्थितीमुळे प्रचंड मोठ्या आर्थिक संकटाला आणि मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत आहे. सरकार आणि प्रशासनाने सध्याच्या निर्बंधावर त्वरित विचार करून मध्यम मार्ग काढावा. अन्यथा, व्यापाऱ्यांमधील संयम संपला असून ते कधीही दुकाने उघडतील, असा इशारा पुण्यातील व्यापारी संघटनांकडून देण्यात आलाय. तसंच व्यापाऱ्यांच्या परिस्थितीचा आढावा पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिला आहे.
पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्याकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासाठी निवेदन दिलं. पुणे शहर, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील व्यापारी या लॉकडाऊन सदृश्य परिस्थितीमुळे अडचणीत आला आहे. कर्जाचे हप्ते, भाडे, वीज बिल, कामगारांचे पगार आणि इतर खर्च व्यापाऱ्यांनी कसे करायचे? असा प्रश्न गेल्या वर्षापासून कायम आहे. अशावेळी आता कुठे व्यापारी त्याचा व्यवसाय सुरू करत असतानाच निर्बंधांच्या नावाखाली लॉकडाऊन केला. व्यापारी या परिस्थितीत जगूच शकत नाही, असं निवगुणे यांनी म्हटलंय.
व्यापाऱ्यांच्या परिस्थितीचा अभ्यास करा
सरकारने व्यापाऱ्यांच्या परिस्थितीचा बारकाईने अभ्यास करावा आणि दुकाने सुरू करण्याची मुभा द्यावी. कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी व्यापारी घेतील. सर्व नियमांचे पालन करून व्यवसाय करतील. मात्र, सरसकट बंद व्यापाऱ्यांना सहन होणार नाही. त्यांच्यातील सहनशीलता आणि संयम संपला आहे. विनाकारण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होऊ नये यासाठी सरकारने त्वरित निर्णय बदलावेत, अशी मागणीही व्यापाऱ्यांकडून करण्यात आलीय.
गुरुवारी निषेध, शुक्रवारी दुकाने उघडणार
दुसरीकडे राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात पुणे व्यापारी महासंघाकडून दोन दीवसीय तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे. या आंदोलनानंतरही प्रशासनाने आपला निर्णय मागे घेतला नाही तर सोमवारपासून नियमित दुकाने उघडण्याचा इशारा व्यापारी महासंघाकडून देण्यात आलाय. गुरुवारी विजय टॉकीज ते क्वार्टर गेटपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा व्यापारी महासंघाचे सदस्य निषेधाचा फलक घेऊन निषेध नोंदवणार आहेत. तर शुक्रवारी सकाळी 8 वाजता दुकानं उघडण्यात येतील आणि संध्याकाळी 6 वाजता बंद केली जातील, असं पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी सांगितलंय.