गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

सराईत गुन्हेगाराची अंत्ययात्रा ; ३३ जणांना पोलिस कोठडी

पुणे : सराईत गुन्हेगार माधव हनुमंत वाघाटे याच्या अंत्ययात्रेत बेकायदा जमाव जमवून दुचाकी रॅली काढत करोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन आणि पोलिसांच्या कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी ३३ जणांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले आणि आरोपींना पाच दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. मात्र, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी ही मागणी फेटाळून आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. या निकालाविरोधात पोलिसांनी सत्र न्यायालयात धाव घेत सरकारी वकिलांमार्फत फौजदारी पुनर्विचार याचिका दाखल केली होती. सत्र न्यायालयाने ती स्वीकारून आरोपींना ३० मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश माधुरी देशपांडे यांनी हा आदेश दिला आहे.

या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक परशुराम वनप्पा पिसे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात ३३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सराईत गुन्हेगार माधव हनुमंत वाघाटे याचा १६ मे रोजी बिबवेवाडी परिसरात खून झाला होता. त्याच्यावर कात्रज स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी वाघाटेच्या दीडशे ते पावणेदोनशे साथीदारांनी करोना प्रतिबंधक नियम डावलून दुचाकीवरून बालाजीनगरमधून सातारा रस्तामार्गे कात्रज स्मशानभूमीपर्यंत अंत्ययात्रेत सहभाग घेतला. त्यांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. पण वाघाटेच्या साथीदारांनी त्यांना न जुमानता जोरजोराने ओरडत नाकाबंदीवरील बॅरिकेड मोडून भरधाव वेगाने गाड्या चालविल्या. लॉकडाउन असताना स्मशानात गर्दी केली होती, तसेच मास्क व इतर नियमांचे पालन केले नव्हते, असे फिर्यादीत नमूद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *