ताज्याघडामोडी

कोवीशील्ड लस घेऊनही अँटीबॉडीज तयार झाल्या नाहीत

लखनऊमधील एका व्यक्तीने सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. कोव्हिशिल्ड लस घेतल्यानंतरही रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम करणाऱ्या अ‍ॅण्टीबॉडीज म्हणजेच प्रतिपिंडे निर्माण झाल्या नाहीत अशी तक्रार या व्यक्तीने केली आहे. लखनऊमधील आशियाना पोलीस ठाण्यात ही तक्रार करण्यात आली आहे.

तक्रारीत अदर पूनावाला यांच्याव्यतिरिक्त डीजीसीएचे संचालक, आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल, आयसीएमआरचे संचालक बलराम भार्गव, राष्ट्रीय आरोग्य मोहीम संचालक अपर्णा उपाध्याय तसंच इतरांची नावं आहे.

प्रताप चंद्रा यांनी ही तक्रार केली असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ एप्रिल रोजी कोव्हिशिल्ड लसीचा पहिला डोस त्यांनी घेतला होता. २८ दिवसांनी लसीचा डोस मिळणं अपेक्षित असताना त्यादिवशी दुसऱ्या डोसचा कालावधी सहा आठवड्यांनी वाढवण्यात आल्याचं सांगण्यात आलं. यानंतर सरकारने हा कालावधी १२ आठवड्यांसाठी वाढवला.

पहिला डोस घेतल्यानंतर आपल्याला बरं वाटत नव्हतं असं प्रताप चंद्रा यांनी सांगितलं आहे. यावेळी त्यांनी आयसीएमआरचे संचालक बलराम भार्गव यांच्या वक्तव्याचा दाखला दिला ज्यामध्ये त्यांनी कोव्हिशिल्ड लसीच्या पहिल्या डोसनंतर शरीरात प्रतिपिंडे तयार होत असल्याचं म्हटल होतं. प्रताप चंद्रा यांनी सरकारमान्य लॅबमध्ये चाचणी केला असता त्यांच्या शऱीरात करोनाशी लढण्यासाठी प्रतिपिंडे तयार झाली नसल्याचं निष्पन्न झालं. उलट त्यांच्या प्लेटलेट्स तीन लाखांहून दीड लाखांवर आल्या होत्या.

लस घेतल्यानंतर आपल्या प्लेटलेटची संख्या निम्म्याने कमी झाली असून करोनाची लागण होण्याची शक्यता वाढली आहे, असा आरोप प्रताप चंद्रा यांनी केला आहे.

पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल करुन घेतली आहे, मात्र एफआयआर दाखल केलेला नाही. प्रकरणाची संवेदनशीलता पाहता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याची माहिती देण्यात आली असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दरम्यान प्रताप चंद्रा यांनी एफआयआर दाखल केला नाही तर आपण कोर्टात जाऊ असा इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *