ताज्याघडामोडी

संभाजीराजे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर राजीनामा देण्याची शक्यता

मुंबई : खासदार संभाजीराजे छत्रपती आज पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका मांडणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर, संध्याकाळी संभाजीराजे छत्रपती पत्रकार परिषद घेणार आहेत. सुप्रीम कोर्टाने गायकवाड समितीचा अहवाल रद्द केल्यानंतर मराठा समाजातील प्रमुखांची आरक्षणाविषयीची भूमिका जाणून घेण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यव्यापी दौरा केला.

संभाजीराजेंनी महाराष्ट्राचा दौरा करुन, विविध संघटना आणि पक्षप्रमुखांची भेट घेत आहेत. संभाजीराजेंनी काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर आज ते मुख्यमंत्र्यांना भेटून आपली भूमिका मांडणार आहेत.

खासदार संभाजीराजे छत्रपती आज मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वर्षा निवास्थानी दुपारी 3 वाजता भेटणार आहेत. त्याआधी दुपारी 12-1 च्या सुमारास ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतील.

संभाजीराजे कोणती घोषणा करणार?

संभाजीराजेंनी 8-10 दिवसापूर्वीच आपण 27-28 मे रोजी भूमिका मांडणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार संभाजीराजे आज आपली भूमिका मांडणार असून, ते राज्यसभा सदस्यत्व अर्थात आपल्या खासदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा करु शकतात. त्याबाबत अधिकृत माहिती नसली, तरी राजकीय वर्तुळात या चर्चेने जोर धरला आहे.

तर राजीनामा देईन

राजीनामा देऊन मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मिटणार असेल तर मी आताच खासदारकीचा राजीनामा देईन, असा इशाराच खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी यापूर्वीच दिला होता. संभाजीराजे छत्रपती 24 मे रोजी सोलापुरात आले असता पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना त्यांनी थेट राजीनामा द्यायला तयार असल्याचं बोलून दाखवलं होतं. राजीनाम्याने जर मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार असेल तर तात्काळ राजीनामा देईन, असं ते म्हणाले होते. संभाजीराजेंच्या राजीनाम्याच्या विधानानं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्यात.

कोण आहेत संभाजीराजे छत्रपती?

सध्या कोल्हापूर संस्थानाची धुरा सांभाळणाऱ्या शाहू महाराज दुसरे यांचे संभाजीराजे हे चिरंजीव आहेत. संभाजीराजे छत्रपती यांचा जन्म 11 फेब्रुवारी 1971 रोजी झाला. त्यांचे शिक्षण कोल्हापूर आणि राजकोट येथे झाले आहे. त्यांनी 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना यश आले नाही. त्यानंतर 2016 साली भाजपच्या शिफारशीवरून राज्यसभेवर त्यांची राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. राज्यसभेवर जाणारे ते कोल्हापूरचे पहिले खासदार ठरले होते.

संभाजीराजेंची कारकीर्द

संभाजीराजे हे राज्यसभेचे खासदार आहेत

संभाजीराजे राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून प्रतिनिधित्व करतात

2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली, मात्र त्यावेळी पराभव

2016 साली भाजपच्या शिफारशीवरून राज्यसभेवर

गडकिल्ले संवर्धनासाठी संभाजीराजेंचं मोठं काम

शिवराज्याभिषेक सोहळ्याला लोकाभिमुख केलं

दिल्लीत शिवजयंती उत्सव साजरे करणारे खासदार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *