ताज्याघडामोडी

१६ आमदारांच्या अपात्रतेबाबातच्या निकालापूर्वी राहुल नार्वेकर दिल्लीला रवाना, हालचालींना वेग

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या शिवसेनेतील १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकरच अंतिम निकाल येण्याची चिन्हे दिसत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने अपात्रतेच्या निर्णयाबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून होणाऱ्या दिरंगाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या सगळ्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश देत सर्वोच्च न्यायालयाने एकप्रकारे विधानसभा अध्यक्षांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय तातडीने घेण्याचे अप्रत्यक्ष निर्देश दिले होते.

यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मी कोणत्याही परिस्थितीत घाईत निर्णय घेणार नाही, अशी भूमिका घेतली होती. मात्र, गुरुवारी राहुल नार्वेकर हे अचानक दिल्लीच्या दिशेने रवाना झाले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

दिल्लीत राहुल नार्वेकर हे कोणाची भेट घेणार, हे सर्वप्रथम पाहावे लागेल. दिल्लीत राहुल नार्वेकर हे भाजपश्रेष्ठींशी शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत चर्चा करणार का? या चर्चेनंतर भाजपश्रेष्ठी राहुल नार्वेकर यांना नेमक्या काय सूचना देणार, या सगळ्याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागली आहे. राहुल नार्वेकर यांची ही दिल्ली भेट १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत अंतिम निर्णय येण्याच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या १६ आमदारांना पक्षांतरबंदी कायद्यातंर्गत अपात्र ठरवल्यास एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावे लागणार का, याकडेही अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. 

दरम्यान, राहुल नार्वेकर यांनी मात्र दिल्लीवारीबाबत या सर्व शक्यता फेटाळल्या आहेत. माझा दिल्ली दौरा हा पूर्वनियोजत होता. त्यासाठीच मी आज दिल्लीला जात आहे. १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात घडणाऱ्या इतर गोष्टींकडे तुम्ही लक्ष देऊ नका. तुम्ही फक्त माझ्या निर्णयाकडे लक्ष द्या. हा निर्णय घेताना कोणताही दिरंगाई होणार नाही. त्याचप्रमाणे निर्णय घेताना घाईही केली जाणार नाही, जेणेकरुन त्यामुळे कोणताही चुकीचा निर्णय घेतला जाणार नाही. या प्रकरणात घटनेच्या चौकटीत बसणारा निर्णय घेतला जाईल, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *