ताज्याघडामोडी

शरद पवार आणि खा.संभाजीराजे यांच्यात अवघ्या १० मिनिटाची भेट

मुंबई: मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे यांनी शरद पवार यांची भेट घेतली असली तरी त्यामधून काहीही साध्य होणार नाही, असे वक्तव्य शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी केले. एकीकडे संभाजीराजे शरद पवार यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचे म्हणतात. मात्र, अवघ्या 10 मिनिटांच्या या भेटीत मराठा आरक्षण, नोकऱ्या, सारथी या सर्व विषयांवर चर्चा कशी काय होऊ शकते, असा सवाल विनायक मेटे यांनी उपस्थित केला.

संभाजीराजे आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर विनायक मेटे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी खास संवाद साधला.

लोकशाहीत कोणीही कोणाला भेटू शकते. मात्र, शरद पवार यांचा मराठा आरक्षणाविषयीचा आजपर्यंतचा दृष्टीकोन पाहता या भेटीतून काहीही साध्य होणार नाही. मराठा आरक्षण, नोकऱ्या आणि सारथी या महत्वाच्या विषयांवरची चर्चा 10 मिनिटांत कशी पूर्ण झाली? पण आता संभाजीराजे चर्चा सकारात्मक झाली, असे म्हणत असतील तर पुढे काय होते ते बघू, असे मेटे यांनी सांगितले.

संभाजीराजे छत्रपती हे राजे आहेत. आम्ही प्रजा आहोत. ते कोणालाही भेटू शकतात. आम्ही जनतेमध्ये जाऊन जनजागृती करत आहोत. आता संभाजीराजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांनी आरक्षण दिलं असतं तर ही वेळच आली नसती, अशी टीका विनायक मेटे यांनी केली.

पवारांच्या भेटीनंतर संभाजीराजे छत्रपती काय म्हणाले?

गेल्या तीन-चार दिवसांपासून मी राज्यभरात फिरून मराठा समाजाच्या भावना जाणून घेत आहे. आज शरद पवार यांना भेटलो तेव्हा मराठा समाज किती अस्वस्थ आणि दु:खी आहे, हे मी त्यांच्या कानावर घातले. त्यामुळे आता मराठा आरक्षणासाठी तुम्ही पुढाकार घेणे गरजेचे आहे. एवढेच नव्हे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नारायण राणे या सगळ्या नेत्यांनीही एकत्र आले पाहिजे.

शरद पवार यांनी या सगळ्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आता मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करेन. त्यानंतर शुक्रवारी रात्री आठ वाजता मी मुंबईत पत्रकारपरिषद घेऊन माझी भूमिका जाहीर करेन, असे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *