रस्त्यावर कधीही अचानक अपघात होण्याची शक्यता असते. कधी-कधी समोरच्या व्यक्तीच्या बेजाबदारपणामुळेही अपघात होतात. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एका महिला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला (एएसपी) नुकताच याचा अनुभव आला.
“या अधिकाऱ्याच्या मुलाला एका एसयूव्हीने चिरडलं. या प्रकरणी पोलिसांनी रात्री उशिरा दोन आरोपींना अटक केली आहे. अधिक तपासात या दोन्ही आरोपींचं हाय-फाय कनेक्शन समोर आलं आहे. एक आरोपी समाजवादी पक्षाच्या नेत्याचा मुलगा असून दुसरा एका सराफ व्यावसायिक कुटुंबातील आहे. ही घटना घडली तेव्हा या दोन्ही आरोपींनी गाड्यांची रेस लावली होती, असं म्हटलं जात आहे.”
पोलीस उपायुक्त (डीसीपी) आशीष श्रीवास्तव यांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितलं की, गोमतीनगर एक्स्टेंशन परिसरात पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. लखनऊ येथील पोलीस मुख्यालयात तैनात असलेल्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक (एएसपी) श्वेता श्रीवास्तव सकाळी आपल्या 10 वर्षांच्या एकुलत्या एक मुलासह (नमिष) मॉर्निंग वॉकला गेल्या होत्या.
जनेश्वर मिश्रा पार्कजवळ नमिष जेव्हा स्केटिंग करत होता तेव्हा एका भरधाव कारने त्याला चिरडलं. एएसपी श्वेता यांनी ही घटना बघताच आरडाओरडा केला. त्यांनी तत्काळ या घटनेची माहिती आपल्या ओळखीच्या लोकांना दिली. यानंतर जखमी नमिषला रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेनंतर श्रीवास्तव कुटुंबीय दु:खात आहेत.