गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मराठा आरक्षण विरोधी डॉक्टरला केले लक्ष्य; कोल्हापुरात हॉस्पिटलची तोडफोड

कोल्हापूर:मराठा आरक्षण विरोधी भूमिका घेणारे डॉ. तन्मय व्होरा यांच्या कोल्हापूर येथील सूर्या हॉस्पिटलची आज ‘ मराठा क्रांती मोर्चा ‘च्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. त्यामुळे तिथे काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर तसेच व्होरा यांनी माफी मागितल्यानंतर तणाव निवळला. 

एक मराठा, लाख मराठा अशा घोषणा देत मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सूर्या हॉस्पिटलवर धडक दिली. तिथे जाब विचारत हॉस्पिटलच्या नामफलकाची कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. अचानक कार्यकर्त्यांनी हे हिंसक आंदोलन केल्याने गोंधळ उडाला. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने येऊन कार्यकर्त्यांना शांत केले. डॉ. व्होरा हे ‘सेव्ह मेरिट सेव्ह नेशन’ या मारवाडी समाजातील संस्थेचे संचालक आहेत. या संस्थेने मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेतल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. या आंदोलनात दिलीप पाटील, सचिन तोडकर यांच्यासह इतर कार्यकर्त्यांचा समावेश होता. व्होरा यांनी माफी मागितल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनामुळे दसरा चौक परिसरात बराच वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मराठा आरक्षणाला कोर्टात आव्हान देणाऱ्या याचिकादारांविरुद्ध मराठा समाजाकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे. त्यात एक याचिकादार डॉ. तन्मय व्होरा हे असून आज त्यांना कोल्हापुरात लक्ष्य करण्यात आले. मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात रद्द झाल्यानंतर व्होरा हे संचालक असलेल्या सेव्ह मेरीट सेव्ह नेशन या संघटनेने आरक्षणातून झालेल्या भरतीवर आक्षेप घेतला आहे. मराठा आरक्षण रद्द झाल्याने या आरक्षणानुसार झालेली भरती बेकायदेशीर आहे. अशा नियुक्त्या रद्द करण्यात याव्यात, अशी मागणी या संस्थेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. हे पत्र मागे घ्यावे, यासाठी मराठा क्रांती मोर्चाने व्होरा यांच्या हॉस्पिटलवर धडक दिली. व्होरा यांनी रुग्णालयातून बाहेर यावे, असे आवाहन आधी करण्यात आले. मात्र व्होरा बाहेर न आल्याने काही कार्यकर्त्यांनी रुग्णालयात घुसण्याचा प्रयत्न केला आणि तणाव निर्माण झाला. व्होरा यांनी माफी मागितल्याशिवाय येथून हटणार नाही, असा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात व्होरा कार्यकर्त्यांसमोर आले. आमच्या पत्रामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो आणि या संस्थेतून बाहेर पडतो, असे व्होरा यांनी सांगितले. त्यानंतर आंदोलक शांत झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *