गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

भाजप युवा मोर्चाचे प्रदीप गावडे यांना शरद पवार, रोहित पवारांवरील टीका भोवली, सायबर पोलिसांनी घेतले ताब्यात

मुंबई : भाजप युवा मोर्चाचे सचिव प्रदीप गावडे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांचे नातू आमदार रोहित पवार यांच्यावर ट्विटरवर टीका केल्याने कारवाई करण्यात आल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. प्रदीप गावडे यांना बांद्रा सायबर सेल पोलिसांनी सकाळी पुणे येथून ताब्यात घेतले आहे. कोणत्याही प्रकारची नोटीस न पाठवताच गावडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील सायबर शाखेतर्फे गावडे यांचा जबाब नोंदवण्यात येत आहे. त्यांच्याविरोधात भादंवि कलम 295 अ, 500 आणि 505/2 कलमांतर्गत तसेच आयटी एक्ट 67 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहीती समोर आली आहे.

माझी अटक हे राजकिय षडयंत्र असून यात मोठे लोक समाविष्ठ आहेत. 421 ची नोटीस मला द्यायला हवी होती. पवार कुटुंबिय जर एवढे घाबरत असेल तर त्यांनी गोविंदबागेत गोट्या खेळाव्यात, अशी खोचक प्रतिक्रिया गावडे यांनी दिली.

दरम्यान, शुक्रवारी (21 मे) याबबात आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर प्रदीप गावडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आठ ते दहा दिवसांपूर्वी मी 54 जणांवर गुन्हा दाखल केला. त्याबाबतीत बरीच चर्चा झाली. ज्या 54 जणांवर मी गुन्हा दाखल केला, त्यातील बरी जणांनी महिलांच्या बाबतीत अत्यंत आक्षेपार्ह असे वक्तव्य केलेले आहे. तर काहींनी महिलांना बलात्काराच्या धमक्या दिलेल्या आहेत. आपल्या पैकी ज्याला कुणाला त्याचे पुरावे हवे असतील, तर त्यांनी मला वैयक्तिक भेटावे. मी तुम्हाला सर्व पुरावे देऊ शकतो, असा दावा गावडे यांनी केला.

जेव्हा 54 जणांवर मी गुन्हा दाखल केला, तेव्हा मला माहिती होते की, हेतू परस्पर माझ्यावर काहीतरी कारवाई करण्यात येईल. अशा कोणत्याही कारवाईला मी घाबरत नाही. मी 54 जणांवर गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांवर कोणत्या प्रकारचे प्रेशर आहे, ते आपण सगळ्यांनी पाहिलेले आहे. ज्यादिवशी गुन्हा दाखल केला त्यादिवशी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी माझी तक्रार केली. त्यांनी पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी त्यांनी संबंधित ट्विट डिलिट केले, असे गावडे म्हणाले.

अनेक ठिकाणी माझ्या विरोधात तक्रार देण्यात आली आहे. तसेच माझ्याविरोधात पुणे आणि मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण माझे जे ट्विट आहेत ते आक्षेपार्ह नाहीत. घटनेने जे मला स्वातंत्र्य दिलेले आहे. माझ्या दोन ट्विटवर आक्षेप घेण्यात आला असल्याचे प्रदीप गावडे म्हणाले.

हिंदूंचा देव असलेल्या यमदेवाचा फोटो मॉर्फ करुन मोदींचा फोटो राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोसीन शेख यांनी लावला होता. माझे ट्विट त्याबाबत होते. मी कायद्याचा विद्यार्थी आहे. जी माहिती अजमेरच्या दर्गाच्या वेबसाईटवर होती, तिच माहिती मी दुसऱ्या ट्विटमध्ये दिली होती. त्यावरुन माझ्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्याचे गावडे म्हणाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *