करोनावर आतापर्यंत जेवढ्या लसी आल्या आहेत त्यांचा एक किंवा दोन डोस दिले जात आहेत. त्यातून करोनाच्या विरोधात बऱ्यापैकी संरक्षण होते असे म्हटले जाते. मात्र तरीही काहींना करोनाची लागण झाल्याचे उदाहरण आहे. तर काहींचा मृत्यू झाला आहे. मात्र आता एका लसीचा आणखी एक म्हणजे तिसरा म्हणजे बुस्टर घेतला तर करोनापासून संपूर्ण संरक्षण होईल असा दावा करण्यात आला आहे.
कोव्हिशील्ड लसीचा तिसरा बुस्टर डोस दिल्यानंतर शरीराला सर्व प्रकारच्या करोना विषाणूंपासून संरक्षण मिळेल, असे एका अभ्यासांती सांगण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काळात 2 डोस पूर्ण झाल्यानंतर कोव्हिशील्डच्या तिसऱ्या डोसलाही सुरुवात होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते आहे.या अभ्यासाचे निष्कर्ष अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र लवकरच ही माहिती अधिकृतरित्या प्रसिध्द केली जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
आता नव्याने झालेल्या संशोधनात लसीचा तिसरा बुस्टर डोस करोना विषाणूच्या स्पाईक प्रोटीनविरुद्ध शरीरात अँटिबॉडीची संख्या वाढवत असल्याचे समोर आले आहे. बुस्टर डोसने अँटीबॉडी रिऍक्शन तयार केल्याचे आढळून आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे करोनाच्या कोणत्याही व्हॅरिएंटचा सामना करण्यास शरीर सक्षम होईल, असे ऑक्सफर्डच्या तज्ज्ञांनी म्हटले.
लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी आगामी काळात नागरिकांना दरवर्षी करोना लसीचा बुस्टर डोस घ्यावा लागेल असेही म्हटल्याचे वृत्त एका संकेतस्थळाने अभ्यासकांच्या हवाल्याने दिले आहे. पुढील काळात करोनाचे आणखी घातक नवे विषाणू येतील. त्यांचा सामना करण्यासाठी हे बुस्टर डोस आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. फायझर कंपनीने देखील करोना लसीच्या तिसऱ्या डोसची गरज असल्याचे नमूद केले आहे.
ज्या प्रमाणे दरवर्षी सिझनल फ्लूची (हंगामी ताप) साथ आल्यावर त्यावर औषध घ्यावे लागते, त्याप्रमाणेच करोनाच्या नव्या विषाणूंचा सामना करण्यासाठी देखील दरवर्षी करोना लस घ्यावी लागेल असे संशोधकांचे म्हणणे आहे. भारतात अलिकडेच कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्यात आले आहे. तसे केल्याने लसीची परिणामकारकता वाढत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. आता नव्या संशोधनानुसार जर दरवर्षी बुस्टर घेतला तर करोनापासून मृत्यूचा धोका पूर्णपणे संपुष्टात येउ शकतो असे मानले जाते आहे.