गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

रुग्णाला मृत घोषित केल्यामुळे राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या समर्थकांची हॉस्पिटलमध्ये तोडफोड

पुणे, 26 एप्रिल : हॉस्पिटलच्या दारात कार्डियाक रुग्णवाहिकेतच रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त झालेल्या नातेवाइकांनी डॉक्टरांना मारहाण करुन हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली. पुण्यातील कोंढव्यातील प्राइम हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली आहे. राष्ट्रवादी नगरसेवक गफूर पठाण आणि त्यांच्या समर्थकांनी आक्रमक होत ही तोडफोड केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा येथील प्राइम हॉस्पिटलमध्ये डॉ. तोतला हे मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास हॉस्पिटलला भेट देण्यासाठी आले होते. त्यावेळी एक कार्डियाक रुग्णवाहिका रुग्णाला घेऊन आली होती.

डॉ. तोतला यांनी त्याला तपासले. त्याचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी वरिष्ठ डॉक्टरांना कळवले.

डॉ. राहुल पाटील यांनी रुग्णाला तपासले. रुग्णाचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबद्दल त्यांनी तेथे जमलेल्या 15 ते 20 जणांना सांगितले. हे समजल्यावर त्यांनी डॉ. तोतला यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी पाइपने मारहाण केली.

तसंच, हॉस्पिटलमधील अकाऊंटंट इमाम हुल्लर यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. एवढंच नाहीतर सुरक्षा रक्षकाच्या केबिनची काच फोडून नुकसान केले. हॉस्पिटलसमोरील दरवाजावर दगड फेकून दरवाजासमोरील कुंडीमधील झाडे फेकून देऊन नुकसान केले.

या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वतः नगरसवेक तिथं असून ही तोडफोड झाली याबाबत डॉ. सिद्धांत तोतला (वय २५, रा. मार्केटयार्ड) यांनी तक्रार दिली आहे. या प्रकरणी कोंढवा पोलीस अधिक तपास करत आहेत.

पुण्यात कोरोना मृत्यूची संख्या वाढू लागल्याने रूग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांवर हल्ले होण्याचे प्रकार वाढू लागले आहे. मागील काही दिवसांपासून घडलेली ही चौथी पाचवी घटना आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *