ताज्याघडामोडी

अडीच लाखाच्या बिलाची मागणी,मृतदेह ताब्यात देण्यास नकार

‘त्या’ हतबल कुटूंबाची व्यथा ऐकून तरी कोण घेणार ?

राज्यासह सोलापूर जिल्ह्यात कोरणाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्था पुरती कोलमडून पडली.अशातच पोटनिवडणुकीचा सोस पंढरपूर शहर तालुक्याला भलताच महागात पडला असून शहरात दरदिवशी वाढत जाणारे रुग्ण आणि या शहरातील हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असणारे बेड याचे प्रमाण अतिशय व्यस्त असून अशातच सोलापूर शहरात देखील ऑक्सिजन ,व्हेंटिलेटर बेड मिळत नसल्याने पंढरपूर    शहर तालुक्यातील अनेक रुग्णांना ऑक्सिजन बेडसाठी सांगलीकडे धाव घ्यावी लागत आहे.आपल्या कुटूंबातील व्यक्तीचा जीव वाचविण्यासाठी ऑक्सिजन बेडच्या शोधात जिल्हा ओलांडून येणारा प्रत्येक पैसेवाला असतो असाच समज हॉस्पिटल चालकांनी करून घेतला कि काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.कारण घटनाही तशीच गंभीर आहे.पंढरपूर शहरातील एका ७५ वर्षीय वयोवृद्ध महिलेस कोरोनाची लागण झाली.ऑक्सिजन कमी होऊ लागल्याने तातडीने रुग्णलयात दाखल करणे गरजेचे झाले.पंढरपुरात तसेच सोलापुरात कुठेच बेड उपलब्ध होईना म्हणून सांगली येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.त्या वृद्धेचा नातू आणि सून हे दोघेच सोबत.उपचार सुरु आहेत एवढचेच उत्तर चार दिवस देण्यात आले.भेटण्यास परवानगी नाकारण्यात आली आणि ३० तारखेला ती वृद्धा मरण पावल्याचे सांगण्यात आले.महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या नातवाकडे अडीच लाख बिलाची मागणी करण्यात आली व त्याशिवाय मृतदेह अंत्यसंस्कारासाठी सोपवणार नसल्याचे सांगण्यात आले अशी माहिती त्या युवकाने आपल्या नातेवाईकांना दिली.पाच दिवसाचे एवढे बिल झालेच कसे हा प्रश्न उपस्थित करत सांगली येथील मानवाधिकार संघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांशी पंढरपुरातील नातेवाईकांनी संपर्क केला व न्याय मिळवून देण्याची मागणी केली.मयत होऊन १२ तासापेक्षा अधिक कालावधी लोटून देखील अंत्यसंस्कारासाठी मृतदेह ताब्यात मिळत नसल्याने झालेल्या वादावादीत पुढे संतप्त प्रतिक्रया उमटली ती हॉस्पिलच्या दर्शनी भागातील तोफोडीने.तेथील स्थानिक माध्यमानी याची दखल घेतल्यानंतर बिल कमी करण्यात आले आणि मृतदेह अंत्यसंस्कारासाठी पाठविण्यात आला.सदर वृद्धेच्या नातवासह आणखी एकावर तोडफोड केल्याचा सांगली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.मात्र या प्रकरणाची दुसरी बाजू जाणून घेत पंढरपूर शहरातील नेते मंडळींनी आणि प्रशासनाने त्या कुटूंबाची व्यथा ऐकून घेणे गरजेचे झाले आहे. 

आपल्या एकुलत्या एक मुलाच्या अकाली निधनानंतर मोठ्या हिमतीने नातवांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करत आलेल्या वृद्धेस मृत्युशय्येवर असताना भेटूही दिले नाही आणि वरून ४ दिवसाच्या बिलापोटी अडीच लाखाची मागणी करण्यात आल्याने व मृत्यूनंतर १२ तास मृतदेह अंत्यसंकारासाठी पाठविण्यास अडवणूक करण्यात आल्याने संतप्त झालेल्या पंढरपुरातील त्या महाविद्यालयीन तरुणास व त्याच्या मदतीसाठी मानवतेच्या दृष्टीकोनातून पुढे आलेल्या सांगली येथील मानवाधिकार संघटनेच्या कार्यकर्त्यास आता हॉस्पिटल कडून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागणार असून याबाबत या कुटूंबाची तक्रार ऐकून सांगली येथील हॉस्पिटल चालकावर कारवाई व्हावी यासाठी  राजकीय पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे झाले आहे. 

या प्रकरणाची सांगली महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी गंभीर दखल घेतली असून त्यांनी या घटनेनंतर अपेक्स हॉस्पिटलला भेट देऊन हॉस्पिटलचा परवाना रद्द करण्याचा इशारा दिला आहे.तर पंढरपुरातील त्या कुटूंबावर झालेल्या अन्यायाविरोधात व दाखल गुन्हा मागे घ्यावा यासाठी राजकीय पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे झाले आहे.             

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *