ताज्याघडामोडी

रुग्णांकडून पैसे लाटणारा डॉक्‍टर ‘एसीबी’च्या जाळ्यात

महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत रुग्णावरील उपचारासाठी मागितले पैसे

तळेगाव दाभाडे – सोमाटणे फाटा येथील पवना हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जनारोग्य योजनेंतर्गत संपूर्ण मोफत औषधोपचार केले जातात. मात्र रुग्णाच्या नातेवाईकाकडून नऊ हजार रुपयांची लाच घेताना डॉक्‍टर व खासगी व्यक्‍तीला रंगेहाथ पकडले. पवना हॉस्पिटलमध्ये मंगळवारी (दि. 23) सायंकाळी 4 वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.

डॉ. सत्यजित कृष्णकांत वाढोकर (वय 58, रा. पवना हॉस्पिटल, सोमाटणे फाटा, ता. मावळ, जि. पुणे) व पवना हॉस्पिटल मार्केटिंग ऑफिसर प्रमोद वसंत निकम (वय 45, रा. दत्तवाडी, आकुर्डी, ता. हवेली) यांना अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (पुणे) पोलीस निरीक्षक अलका सरग यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळू नामदेव आंद्रे (वय 65, रा. नाणे, ता. मावळ यांचे गेल्या सहा महिन्यांपासून पवना हॉस्पिटलमध्ये शासनाच्या महात्मा फुले जनारोग्य योजनेंतर्गत संपूर्ण मोफत डायलिसिस व औषधोपचार केले. या औषधोपचारासाठी तक्रारदार नंदकुमार उर्फ गोट्या आंद्रे यांच्याकडून महिन्याला 20 हजार रूपये घेत होते.

तक्रारदार आंद्रे यांचे वडील अडीच वर्षांपासून उपचार घेत होते. शासनाची संपूर्ण मोफत योजना असताना पवना हॉस्पिटल शासनाकडून रुग्णाचे पैसे घेत आहेत. तक्रारदार यांना 10 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे कार्यालयात तक्रार केली. पोलीस निरीक्षक अलका सरग, पोलीस निरीक्षक सुनील बिले, पोलीस हवालदार टिळेकर, पोलीस नाईक वैभव गोसावी, चालक पोलीस हवालदार प्रशांत वाळके या पथकाने सापळा रचून आरोपी डॉ. सत्यजित वाढोकर व प्रमोद निकम यांना रंगेहात अटक केली.रात्री उशिरापर्यंत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. आरोपी वाढोकर व निकम यांना बुधवारी (दि. 24) न्यायालयात हजर करणार आहेत. या प्रकरणी पोलीस निरीक्षक अलका सरग तपास करीत आहेत.

दरम्यान, या योजनेंतर्गत आणखी कोणाची फसवणूक झाली असेल, तर संपर्क साधा. मावळ तालुक्‍यात खासगी रुग्णालयात रुग्णांची आर्थिक लूट करत असल्याचा घटना ताज्या आहेत. शासनाच्या मोफत योजनाचा लाभ देण्यासाठी खासगी दवाखाने दोन्हीकडून पैसे घेतात. या घटनेने रुग्ण व दवाखान्यामध्ये खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *