ताज्याघडामोडी

शहरी आठवडे बाजारात शेतकरीच भाजी विकू शकणार

शेतकऱ्यांना आपला शेतीमाल थेट शहरात ग्राहकांना विक्री करता येणार आहे. यासाठी महापालिकेकडून शहरात जागा उपलब्ध करून दिल्या आहेत. महापालिका, कृषी विभाग आणि पणन मंडळाच्या संयुक्त बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश जगताप यांनी सांगितले. दरम्यान, सध्या शहरात सुरू असलेल्या बाजाराची तपासणी केली जाणार असून त्या ठिकाणीही शेतकऱ्यांना जागा तसेच आवश्‍यक सुविधा दिल्या जाणार आहेत.

शहरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात आठवडे बाजार सुरू झाले आहेत. यातील अनेक बाजार महापालिकेच्या जागेवर भरत असून अनेक ठिकाणी रस्त्यावरच बाजार भरविले जात आहेत. त्यातही प्रामुख्याने या बाजारात शेतकऱ्यां ऐवजी स्थानिक भाजी विक्रेते भरवित आहेत. यामुळे शेतकऱ्याच्या नावाखाली ग्राहकांची लूट केली जात असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या आहेत.

त्यामुळे महापालिकेने पणन मंडळाकडे याबाबत पत्रव्यवहार करून शहरातील अनधिकृत आठवडे बाजारावर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. यावर पालिकेनेच कारवाई करावी तसेच याबाबत धोरण ठरवावे, अशा सूचना पालिकेस करण्यात आल्या होत्या त्यावर निर्णय घेण्यासाठी नुकतीच बैठक झाली असून त्यात याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

70 पेक्षा अधिक अनधिकृत बाजार…
शहरात महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात 70 पेक्षा अधिक अनधिकृत आठवडे बाजार असल्याचे समोर आले आहे. तर, महापालिका निवडणुकीच्या तोंडावर या बाजाराची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून त्यासाठी पालिकेच्या जागांवर अतिक्रमण केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *