राष्ट्रवादी कॉग्रेसचे पंढरपूर तालुका अध्यक्ष दीपक पवार याना पदावरून हटविल्यामुळे नाराज असलेल्या पंढरपूर शहर व तालुका राष्ट्रवादीतील एका गटाने आज येथील विठ्ठल हॉस्पिटल येथे आयोजित केलेल्या बैठकीत नाराजी व्यक्त करताना पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाच्या आगामी पोटनिवडणुकीत पक्षाच्या उमेदवारीबाबत तसेच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पॅनल उभे करण्याबाबत राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येण्याबरोबरच गेल्या अनेक वर्षापासूनच सुप्त कलह पुन्हा प्रकट झाला आहे अशीच प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसून येत आहे.
काल जसे राष्ट्रवादी कॉग्रेसच्या तालुका अध्यक्ष पदावरून ऍड. दीपक पवार याना हटविण्यात आले तसेच दहा दिवसापूर्वी पंढरपूर शहरातील विविध प्रश्नाबाबत सातत्याने आक्रमक भूमिका घेत संघर्ष करीत आलेले संदीप मांडवे याना हटविण्यात आले होते.व विजयसिह देशमुख यांच्याकडे असलेले मतदार संघ अध्यक्षपद सर्मथक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर संदीप मांडवे याना प्रदान कऱण्यात आले होते.मात्र आज विठ्ठल हॉस्पिटल मध्ये घडलेल्या घटनाक्रमामुळे मतदार संघ अध्यक्ष संदीप मांडवे यांनाही प्रतिक्रिया देण्यासाठी पुढे यावे लागले असल्याचे दिसून येते.