ऊस वाहतूक दर वाढवून मिळावा व एक रकमी एफ आर पी मिळावी या प्रमुख मागणीसाठी संपूर्ण जिल्ह्यात एकत्रित लढा उभारण्याचा निर्णय टेंभुर्णी येथे झालेल्या विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला .
इंधनाच्या किमती वाढल्याने ऊस वाहतूक दर वाढवून देण्यात यावा व एक रकमी एफआरपी देण्यात यावी या प्रश्नासाठी भविष्यात उभारण्यात येणार्या आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी टेंभुर्णे येथे शिवगौरी कॉम्प्लेक्स मध्ये बुधवारी दुपारी जनशक्ती शेतकरी संघटना, रयत क्रांती शेतकरी संघटना, बळीराजा शेतकरी संघटना तसेच शिवसेना-भाजप व मनसे या पक्षांचे पदाधिकारी यांच्या बैठकीत कोणा एकाच्या नाहीतर सामुदायिक नेतृत्वाखाली लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला .
यावेळी जनशक्ती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खूपसे म्हणाले की कोणाच्याही नेतृत्वाखाली आंदोलन केले तरी चालेल परंतु एफआरपी रक्कम १४ दिवसात मिळाली पाहिजे. या आंदोलनामध्ये आता ट्रॅक्टरचे टायर फुटणार नाही परंतु कारखानदारांचे डोके फुटल्याशिवाय राहणार नाही. गाळपाचे सर्व विक्रम मोडणार्या कारखान्यांनी दर देण्याचा विक्रम करून दरही एक नंबर द्यावा.
या बैठकीचे संयोजक शिवसेनेचे नेते संजय कोकाटे म्हणाले की दर तीन वर्षानंतर ऊस तोडणी कामगारांना दर वाढवून मिळतो मात्र मागील अनेक वर्षापासून ऊस वाहतूक दर वाढविण्यात आलेला नाही. रिकवरी चोरून शेतकऱ्यांना कमी भाव दिला जात आहे. वाहतूक दर वाढवून दिल्याशिवाय ऊस वाहतूक करू नये. आता तुकड्या-तुकड्याने न लढता एकत्रित लढा उभारण्याची गरज आहे .
या प्रश्नासाठी पक्ष आडवा येत नाही असे झाले तर मी वेगळा विचार करेन.
रयत क्रांतीचे राज्य कार्याध्यक्ष दीपक भोसले म्हणाले की जोपर्यंत पहिला हप्ता व वाहतूक दर फिक्स होत नाही तोपर्यंत ऊसाचे टिपरूही वागू नका. या प्रश्नासाठी सर्व गट व पक्षीय राजकारण बाजूला ठेवून लढा उभारावा लागेल. रयत क्रातीचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. सुहासस पाटील म्हणाले की सोलापूर जिल्ह्यातील सर्वच कारखाने रिकव्हरी चोरून शेतकऱ्यांची लूट करीत आहेत .जिल्ह्यातील सहकारी कारखान्यांनी सरासरी ९.३८ टक्के तर खासगी कारखान्यांनी ८.१० टक्के रिकव्हरी दाखवली आहेत. ही रिकव्हरी तपासून त्यासाठीचा लढा भविष्यात उभारावा लागेल.
यावेळी किसान मोर्चाचे माउली हळवणकर, भाजपा जिल्हा चिटणीस दत्तात्रेय मोरे, रयत क्रांतीचे जिल्हाध्यक्ष शशिकांत थोरात. बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामदास खराडे, जिल्हा संघटक विठ्ठल मस्के, सुहास घोडके, राहुल बिडवे यांनीही मनोगत व्यक्त केले .
या बैठकीस रयत क्रांतीचे अण्णा जाधव,प्रहार संघटनेचे अमोल जगदाळे, राजकुमार सरडे ,बाळकृष्ण बोबडे, राहुल बिडवे ,दिगंबर ननवरे, हनुमंत गिरी, सुनील पाटील, विशाल इंदलकर ,सरपंच विजय पवार, भागवत कोकाटे, पोपट अनपट ,सोमनाथ जवळगे,बळि केचे यांच्यासह वाहतूकदार व पदाधिकारी उपस्थित होते.
