ताज्याघडामोडी

शिवरायांच्या पराक्रमासोबतच त्यांचा दृष्टीकोनही उदात्त होता – प्रभारी संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर स्वेरीत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१ वी जयंती साजरी

पंढरपूर- ‘शिवरायांनी प्रतिकुलतेतून निर्माण केलेल्या स्वराज्याचे  मूर्तिमंत अनुकरण स्वेरीत दिसून येत असून छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्तुत्व आणि वकृत्व या दोन बाबींच्या समन्वयातून स्वराज्य उभे केले. जर स्वराज्य समजून घ्यायचे असेल तर सर्वप्रथम शिवपूर्व कालखंड समजून घ्यावा लागेल. शिवरायांचे व्यक्तिमत्व समजून घेताना अंगावर काटे येतात, त्यांची प्रेरणा अजूनही घेतली जाते. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, सरंजामशाही, इमामशाही यातूनही शहाजहान, अकबर, औरंगजेब यांनी स्वतःची सत्ता असून देखील शिवरायांच्या महाराष्ट्राकडे त्यांचे लक्ष होते. महाराजांनी कमी मनुष्यबळामध्ये शत्रूला शह दिला. आपल्याकडे द्रव्य आणि मनुष्यबळ कमी आहे तसेच वेळ देखील कमी आहे हे ओळखून त्यांनी निसर्गाला सखा मानले आणि सह्याद्रीच्या दुर्गम भागात गडकिल्ले बांधले. यातून शिवरायांच्या पराक्रमासोबतच त्यांचा दृष्टीकोनही उदात्त होता हे दिसून येते.’ असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या भाषा व वाड्ःमय संकुलाचे प्रभारी संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी केले.
          गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूटमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१ वी जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या भाषा वाड्ःमय संकुलचे प्रभारी संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि दुर्ग बांधणी’ या विषयावर ऑनलाइन मार्गदर्शन करत होते. प्रारंभी स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले व प्रास्ताविकात म्हणाले की ‘लहाणपणापासुनच्या मानसिकतेत आपली वाढ होत असते. यातून बाहेर पडण्यासाठी अशा थोर युगपुरुषांच्या कार्याची प्रेरणा घ्यावी लागते. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यावेळी त्यांचे वय अवघे १३,१४ वर्षे होते. खेळण्या-बागडण्याच्या वयातच त्यांनी स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले. आयुष्याची  पायाभरणी करत असताना आपल्या व्यक्तिमत्वामध्येही असाच एखादा वेगळा गुण आपण या वयात निर्माण करावा.’ प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे यांच्या हस्ते स्वेरीच्या मुख्य इमारतीच्या पोर्चमध्ये शिवमूर्तीचे पूजन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीनंतर कमी विद्यार्थी प्रवेश क्षमतेसह आणि कोरोना महामारीपासून काळजी घेण्याच्या सूचनेनुसार महाविद्यालये सुरु झाली असली तरी प्रशासनाच्या सूचनेनुसार ५० टक्के विद्यार्थी क्षमतेने महाविद्यालये सुरु आहेत. याच कारणाने अधिक गर्दी होऊ नये म्हणून प्रशासनाच्या सूचनेनुसार शिवजयंती यावेळी साधेपणाने साजरी करण्यात आली. तरी ऑनलाइन आणि लाईव्ह फेसबुक च्या माध्यमातून स्वेरी अंतर्गत असलेल्या सर्व महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थ्यांना बौद्धिक मेजवानी घेता आली. यावेळी बोलताना डॉ. कोळेकर पुढे म्हणाले की ‘भक्ती, ज्ञान आणि योग साधना असलेल्या स्वेरी अभियांत्रिकीतून वाहत असलेली ज्ञान गंगोत्री ही खेडोपाड्यापासून देश विदेशात वाहत आहे. शिवरायांचे शत्रूंच्या आत्मविश्‍वासाकडे प्रचंड लक्ष असायचे. शत्रूंनी आत्मविश्वास हरवला तर त्याचा जास्त फायदा व्हायचा. स्वराज्य निर्माण करण्यासाठी शिवरायांसारख्या राजाची गरज होती. शिवरायांनी रायरेश्वर मंदिरात शपथ घेतली आणि बहुजनांचा उद्धार करण्यासाठी राज्य निर्माण केले. अनेक राजे होऊन गेले परंतु शिवरायांसारखे कार्य अद्याप कोणत्याही राजांना जमले नाही. सत्ता निर्माण करताना त्या राजाच्या नेतृत्व, वैभव आणि विचार यावर पुढील यश अवलंबून असते. शिवरायांनी कोकण आणि महाराष्ट्र यांना जोडणाऱ्या घाट भागांमध्ये दुर्गाची बांधणी केली. शिवरायांनी किल्ले निर्माण करताना त्यामागचा दृष्टिकोन प्रथम पाहिला. त्यामुळे दुर्गम भागात येऊन त्यांनी स्वराज्य निर्माण केले आणि दुर्गम भागाचा त्यांनी खुबीने वापर केला.’ डॉ. कोळेकर यांनी किल्ल्याचे विविध प्रकार सांगताना ‘वनदुर्ग, गिरीदुर्ग, गुहादुर्ग, चतुर्भुज दुर्ग, कर्दम दुर्ग, भुई दुर्ग, श्वान दुर्ग, गरम दुर्ग असे आठ प्रकार सविस्तरपणे सांगून त्यांनी किल्ल्यांचे महत्व स्पष्ट केले. शिवरायांना मराठी संस्कृती, हिंदी संस्कृती व भारतीय संस्कृती यांच्याबद्दल प्रचंड अभिमान होता. जनता हिंदू असो वा मुस्लिम असो परंतु गुण्यागोविंदाने राहत होती आणि त्याचा परिणाम जनतेवर व स्वराज्यावर होत होता. किल्ले दुर्ग बांधणीमध्ये त्यांनी इतिहासाबरोबरच   भोगोलिक परिस्थितीला देखील प्रचंड महत्त्व दिले. शत्रुंची होणारी अडचण आणि वाटणारा अवघडपणा हाच शिवाजी महाराजांचा प्लस पॉइंट होता. त्यामुळे ज्याठिकाणी शत्रू सहजासहजी जाणार नाहीत अशा कोकण आणि महाराष्ट्र यांना जोडणाऱ्या घाट माथ्यावर दुर्गम ठिकाणी महाराजांनी किल्ले बांधणी उत्तमपणे केली. शिवाजी महाराजांना दुरदृष्टी होती त्यामुळे त्यांनी गड, किल्ले दुरुस्तीसाठी काही द्रव्य राखून ठेवले होते. महाराजांनी बांधलेल्या सर्व किल्ल्यांची रचना विशिष्ट होती. एकाच गडावर पाण्याची साठवण विविध ठिकाणी केली होती. त्यामुळे शत्रूपासून पाण्याचे संरक्षण केले जायचे.’ असे सांगून जलदुर्गची माहिती देताना त्यांनी सिव्हील इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी ‘कुलाबा’ आणि ‘अलिबाग’ या किल्यांची पार्श्वभूमी पाहताना पद्मदुर्ग किल्यातील बांधकाम, सिमेंट आणि मटेरियल कशा प्रकारे वापरावे याचीही जाणीव करून दिली. दृष्टी, विवेक, विनय,चतुरता व संयम हे विविध बहुआयामी व्यक्तिमत्व शिवाजीराजांजवळ होते. छत्रपती शिवराय आणि दुर्ग बांधणी हा अभियंत्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या संशोधनाचा भाग डॉ. कोळेकर यांनी सांगितला. महाराजांनी प्रशासन, अर्थकारण, पर्यावरण यांची उत्तम  सांगड घातली होती.’ असे सांगून गड किल्ल्यांची अभ्यासपूर्ण माहिती दिली. यावेळी स्वेरीचे विश्वस्त बी.डी. रोंगे, माजी अध्यक्ष व विश्वस्त विजय शेलार, कॅम्पसचे इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मनियार, डिप्लोमा इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवे, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग  आदी उपस्थित होते. प्रा. यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *