ताज्याघडामोडी

बिस्किटाच्या पाकिटावरून गाडी गेल्याने झाला वाद, एकाला जागेवर संपवलं तर 8 जणांना केलं गंभीर जखमी

आंध्रप्रदेशमधील प्रकाशम जिल्ह्यातील कोकणमीतला भागात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रस्त्यावरून जात असताना बिस्किटचा पुडा खाली पडला आणि त्यावरून दोन चाकी वाहन गेले.

वाहन गेल्यानंतर दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. भांडण इतके वाढले की, एका 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर 8 जण जखमी झाले आहेत. डेक्कन क्रॉनिकलच्या वृत्तानुसार, पोलिसांनी मृताची ओळख पटवली आहे. थलुरी विनोद असे त्याचे नाव असून तो वेंगलमपल्ली गावचा रहिवासी आहे.

कोकणमितला पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, टी जॉन्सन नावाचा व्यक्ती दारूच्या नशेत होता. तो मोटारसायकलवरून घरी जात होता. किराणा सामानाच्या पिशवीत तो बिस्किटांची पाकिटे घेऊन जात होता. अचानक बिस्किटांचे पॅकेट रस्त्यावर पडले. यादरम्यान वेंगलमपल्ली येथील रहिवासी असलेल्या नागराजू या दुसऱ्या दुचाकीवरून येत असताना त्यांची मोटारसायकल बिस्किटाच्या पाकीटावर गेल्याने ते पाकीट फुटलं. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जॉन्सनने नागराजू यांना जाब विचारण्यासाठी थांबवले. यानंतर दोघांमध्ये जोरदार वाद झाला. त्यांच्यातील वाद हाणामारीत पोहोचला. यानंतर नागराजू यांनी मित्र आणि कुटुंबीयांना घटनास्थळी बोलावले.

त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला करण्यास सुरुवात केली. मारामारीदरम्यान जॉन्सनचा भाऊ विनोद याच्या डोक्यावर कोणीतरी जोरात काठी मारल्याने त्यामुळे खूप रक्त वाहू लागले. जास्त रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

हल्ल्यात आठ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाच्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्याला 20 टाके पडले. दोन जणांना फ्रॅक्चर झाले असून इतर गंभीर जखमी झाले आहेत. दोन्ही गटांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या मारामारीत सहभागी असलेल्यांची ओळख पटवली जात असून आरोपींचा शोध सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *