जळगाव, 15 फेब्रुवारी : वकील माणसांना गुन्हेगारी प्रकरणांतून बाहेर काढत न्याय मिळवून देतात. मात्र इथं वकिलालाच जाळ्यात अडकवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. जळगाव शहरात हा प्रकार घडला आहे.
एका तरुणीनं वकिलाकडे खंडणी मागितली आहे. तिनं वकिलाला आधी फेसबुक रिक्वेस्ट पाठवली. त्यानं ती स्वीकारल्यावर तरुणीनं वकीलाला आक्षेपार्ह व्हिडिओ दाखवला. त्याच्याकडे ऑनलाईन खंडणी मागितली. याप्रकरणात गणेश कॉलनी इथं राहणाऱ्या 31 वर्षीय ऍड. प्रशांत नाना बाविस्कर यांनी तक्रार दिली आहे.
त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिवारी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऍड. प्रशांत नाना बाविस्कर यांना त्यांच्या फेसबुक पेजवरून 11 फेब्रुवारी रोजी एका तरुणीच्या अकाऊंटवरून फ्रेंड रिक्वेस्ट आली.
बाविस्कर यांनी ती स्वीकारली. त्यानंतर तरुणीच्या अकाऊंटवरून त्यांना एक अश्लील व्हिडिओ पाठवला गेला. तो व्हिडिओ प्रशांत पाहत असल्याचं भासवलं गेलं होतं. तरुणीनं आपल्या बनावट अकाऊंटच्या मोबाईल नंबरवरून हा व्हिडिओ ऍड. प्रशांत बाविस्कर यांच्या व्हॉट्सऍप नंबरवर पाठवला. या व्हिडिओमध्ये तरुणीनं आपण स्वतः असल्याचं भासवलं आणि प्रशांत यांच्याकडून खंडणी मागितली.
घाबरून जात ऍड. बाविस्कर यांनीही संबंधित व्यक्तीच्या अकाउंटवर ऑनलाईन 7 हजार 499 रुपये पाठवले. दरम्यान फसवणूक होत असल्याचं त्यांना लक्षात आलं. त्यानंतर ऍड. बाविस्कर यांनी जिल्हा पेठ पोलीस ठाणे गाठत फिर्याद दिली. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक विलास शेंडे करत आहेत.