गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पकडलेला ट्रॅक्टर वाळू माफियाने पळवला, सांगोल्यात रस्त्यावर उडाला हाहाकार!

पंढरपूर : सांगोल्यात पोलिसांनी पकडून एसटी स्टँडच्या गोडावूनमध्ये ठेवलेला ट्रॅक्टर वाळू माफियांच्या माणसाने पळवण्याचा प्रयत्न केला. ट्रॅक्टर पळवून नेत असताना न आवरल्याने सांगोल्याच्या मुख्य रस्त्यावर बराच वेळ गोंधळ झाल्याचं अनुभवायला मिळाले. पोलिसांनी आता या अज्ञात माफियांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला असला तरी या ट्रॅक्टरच्या धडकेमुळे 3 ते 4 दुकाने व एका मोटारसायकलचं नुकसान झालं आहे.

चार पाच दिवसापूर्वी हा ट्रॅक्टर तहसील कर्मचाऱ्यांनी वाळू वाहतूक करताना पकडला होता. हा ट्रॅक्टर पकडून एसटी स्टँडच्या गोडावूनमध्ये लावला होता. गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास वाळू माफियांच्या माणसाने एसटी स्टँड गेट तोडून ट्रॅक्टर बाहेर काढला आणि चालकाला तो टॅक्टर कंट्रोल न झाल्याने रस्त्यालगत असलेल्या पानटपरीवर ट्रॅक्टर जोराने धडकला.

त्यानंतर त्याच्या शेजारचे दुकान आणि एका दुचाकीलाही ट्रॅक्टरला धडकला. यानंतर चालकाने चालू ट्रॅक्टर सोडून पळ काढला. यावेळी रस्त्यावर वीना वाहक ट्रॅक्टर धडका देतानाच व्हिडीओ एका नागरिकाने काढला. काही दिवसापूर्वी दिल्लीतील शेतकरी आंदोलनात ट्रॅक्टर जोरात पळवताचे व्हिडीओ बातम्यातून पाहायला मिळाले होते. त्याच पद्धतीने या वाळू माफियाने ट्रॅक्टर चालवून या घटनेची आठवण करून दिली.

एकीकडे पोलिस अधीक्षक वाळू माफियांवर आता जरब बसत असल्याचे सांगत असताना सांगोल्यातील भर चौकात घडलेला हा प्रकार थेट पोलीस प्रशासनाला आव्हान देणारा ठरला आहे. चालत ट्रॅक्टर सोडून पळालेला माफिया एका कारमधून पळून गेल्याचे नागरिक सांगत असून सुदैवाने यात मनुष्यहानी झाली नसली तरी आता तरी या वाळू माफियांना पोलिसांचा धाक बसेल अशी कारवाई करणार का? असा सवाल सांगोल्यातील नागरिक विचारत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *