गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मुलीच्या लग्नासाठी मालकाच्या मुलांनाच केलं किडनॅप, एक कोटींची मागितली खंडणी

मुंबई, 28 जानेवारी :  मुलीच्या लग्नासाठी तिच्या वडिलांकडं पैसे नव्हते. त्यामुळे लग्नातील खर्चामध्ये कपात करणे किंवा वैध मार्गांनं कर्ज घेणे हा पर्याय त्यांच्याकडे उपलब्ध होता. हा पर्याय टाळून ड्रायव्हर असलेल्या वडिलांनी मालकाच्या जुळ्या मुलांना किडनॅप केलं. या प्रकरणातील आरोपी व्यक्ती एका बिल्डरच्या गाडीची ड्रायव्हर होती. त्यानं इंटनॅशनल कॉलिंग अ‍ॅपच्या मदतीनं मालकाकडं एक कोटीचीं खंडणी मागितली. आपला कट यशस्वी झाला अशी समजूत त्या ड्रायव्हरची होती. तो या समजुतीमध्ये असतानाच मुंबई पोलिसांनी त्याला आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे.

या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘या प्रकरणातील आरोपीच्या मालकाला 10 वर्षांची जुळी मुलं होती. आरोपी या मुलांना आठवड्यातून तीनदा अंधेरीतील मनिष नगरमध्ये टेनिस कोचिंगसाठी नेत असे. 25 जानेवारी रोजी देखील आरोपी मुलांना कोचिंग सेंटरमध्ये पोहचवण्यासाठी बाहेर पडला होता. त्याच दिवशी संध्याकाळी आरोपीनंच या दोन्ही मुलांचं किडनॅप झाल्याची तक्रार डीएन नगर पोलीस स्टेशनमध्ये केली दाखल केली होती.’

‘दोन्ही मुलांना टेनिस प्रॅक्टिससाठी नेत असताना एक व्यक्ती फॉर्च्यूनरमधून आली. ती व्यक्ती चाकूचा धाक दाखवून गाडीमध्ये शिरली आणि गाडीला जबरदस्तीनं जुहूमध्ये नेलं. त्या ठिकाणी अपहरणकर्त्यानं मला आणि दोन्ही मुलांना जबरदस्ती दोन-दोन गोळ्या खाऊ घातल्या.

त्यानंतर अपहरणकर्त्यानं सर्वांचे हात बांधले. थोड्याच वेळात तिथं तीन मोटारसायकलवर 6 जण आले. त्यांनी क्रोमा मॉल समोर उभ्या असलेल्या बसमध्ये एका मुलाला बांधलं तर ड्रायव्हर आणि अन्य एका मुलाला आपल्या सोबत नेलं,’ अशी तक्रार ड्रायव्हरनं केली होती. त्यानंतर आरोपीनं इंटरनॅशनल कॉल अ‍ॅपच्या मदतीनं एक कोटींची खंडणी मागितली.

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं तपास सुरु केला. पोलिसांनी एका मुलाला कारमधून सोडवलं तर बसमध्ये ज्याला बांधलं होतं तो मुलगा यापूर्वीच काही लोकांच्या मदतीनं अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटला होता.

पोलिसांना तपासादरम्यान या प्रकरणाची तक्रार करणाऱ्या ड्रायव्हरवरच संशय आला. त्यांनी या ड्रायव्हरची सखोल चौकशी केली. या चौकशीमध्ये त्यानं गुन्हा कबूल केला. मुलीच्या लग्नाचे पैसे जमवण्यासाठी हा गुन्हा केल्याचं ड्रायव्हरनं मान्य केलं. त्यानं खंडणीमधून मिळालेली 50 टक्के रक्कम मेहुण्याला देण्याचं कबुल केलं होतं. त्याच्या मदतीनंच त्यानं मालकाच्या मुलांना किडनॅप केलं. पोलिसांनी आता दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *