ताज्याघडामोडी

न्या.गायकवाड आयोगाच्या शिफारशीनुसार मराठा समाजाला ओबीसी च्या सवलती द्या

मराठा समाजाला न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने राज्य घटनेच्या ३४० कलमानुसार ‘ओबीसी’साठी पात्र ठरवले आहे. त्यामुळे मराठा समाजाचा सरसकट ओबीसी प्रवर्गात समावेश करावा,’ अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.

डॉ. भानुसे म्हणाले, ‘मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा ही १९९१पासून मागणी आहे. हेच आरक्षण टिकेल आणि ते राज्य सरकारच्या अखत्यारित आहे. त्यावर त्वरित निर्णय घ्यावा. अन्यथा संभाजी ब्रिगेड संवैधानिक मार्गाने तीव्र आंदोलन करेल. संभाजी ब्रिगेडच्या राज्य कार्यकारिणीची १८ सप्टेंबर रोजी प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोज आखरे, महासचिव सौरभ खेडेकर यांच्या उपस्थितीत ऑनलाइन बैठक पार पडली. त्यामध्ये हाच निर्णय घेतला. मराठा सेवा संघ व त्याचे ३३ कक्ष गेली तीस वर्षे मराठा आरक्षणाची भूमिका घेऊन महाराष्ट्रात काम करत आहेत. कोपर्डी घटनेनंतर मराठा समाजाने ५८ मोर्चे काढले. अनेक न्यायिक मागण्या पुढे आल्या. त्यामध्ये आरक्षणाची मागणी जोर धरू लागली. सरकाने पहिला टप्पा म्हणून काही सवलती दिल्या. न्यायमूर्ती गायकवाड आयोगामार्फत सर्वेक्षण केले. त्यात राज्यातील मराठा समाज हा सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागास असल्याचे निरीक्षण नोंदवले. त्याच आधारे घटनेच्या १५(४) व १६(४) या कलमांतर्गत १३ टक्के नोकऱ्यांमध्ये आणि १२ टक्के शिक्षणामध्ये असा महाराष्ट्रापुरता ‘एसईबीसी’ हा वर्ग तयार करून मराठा समाजाला सवलती दिल्या. काही दिवस या सवलती सुरू राहिल्या. सर्वोच्च न्यायालयात त्यास अंतरिम स्थगिती दिली. त्यामुळे येथून पुढे ‘ओबीसी’ समावेशासाठी लढा उभारू. याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षांना विभागीय आयुक्तांमार्फत निवेदन दिले, राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्या मार्फतही निवेदन देऊ,’ असेही ते म्हणाले.

ओबीसीमध्ये ज्याप्रमाणे वेगवेगळे वर्ग आहेत. (एनटी ए, बी, सी, डी) तशीच एक सब कॅटेगरी तयार करून मराठा समाजास आरक्षण द्यावे आणि त्यानंतर ओबीसीची टक्केवारी वाढवण्यासाठी नचिपन समितीचा अहवाल स्वीकारावा. कुणबी नोंदी मराठा समाजात सापडतात, पण गेल्या अनेक वर्षांपासून सरकारने या प्रकारचे दाखले न देण्याच्या अलिखित घोषणा व सूचना दिल्या आहेत. हे दाखले देण्यासाठी शासनावर दबाव वाढवणार आहोत,’ असा इशाराही त्यांनी दिला. पत्रकार परिषदेला ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राम भगुरे महानगराध्यक्ष वैशाली खोपडे, रेखा वाहटुळे, रवींद्र वाहटुळे, राजेंद्र पाटील, ॲड. अविनाश औटे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *