Uncategorized

दादा आम्हाला नानांची उणीव भासू देऊ नका,आमचा आधार हरपलाय !

             पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे आमदार,ज्यांनी १९७८ नंतर पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात २००९ मध्ये सामान्य जनतेला सोबत घेत साऱ्या महाराष्ट्राला आश्चर्यचकित करणारा विजय संपादन करीत पूर्वाश्रमीच्या आण्णा गटाचा आणि १९९७ नंतर विठ्ठल परिवाराचा झेंडा हाती घेऊन तालुक्याच्या राजकारणात आमचाही आमदार होईल याची वाट पहात जीवापाड परिश्रम घेत,राजकीय दबावतंत्राला झुगारत निवडणुकीच्या रणधुमाळीत हि तर स्वाभिमानाची लढाई आहे असे समजून परिश्रम घेणाऱ्या समर्थकांचे,कार्यकर्त्यांचे स्वप्न स्व.भारत भालके यांनी आमदार होऊन पूर्ण केले होते.आणि तिथूनच खऱ्या अर्थाने पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यात विठ्ठल परिवारास,आमदार स्व.भालके समर्थक गटास मोठी उभारी आली होती.२००९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर आमदार स्व.भारतनानांनी तीर्थक्षेत्र विकास आघाडीची स्थापना करीत पंढरपूर शहरातील गल्लीबोळातील वर्षानुवर्षे तेच चेहरे आणि तोच अध्याय याला कंटाळून राजकीय वाटचालीबाबत उदासीन झालेल्या कार्यकर्त्यांना,समर्थकांना सोबत घेत पंढरपूर नगर पालिकेची निवडणूक लढविली आणि तीर्थक्षेत्र आघाडीच्या हाती जनतेने सत्ताही सोपविली.परंतु अतिपरिचयात अवज्ञा या म्हणीप्रमाणे नागरपालिकेवरील सत्ता हि केवळ माझ्यामुळेच टिकून आहे हि भावना संघिक आणि निष्ठेच्या भावनेला बाजूला सारत प्रबळ ठरली.आणि याचीच परिणीती म्हणून बंडखोरी होत नगर पालिकेत सत्तांतर झाले.पण तरीही या शहरातील बहुतांश मतदारांनी भारत भालके यांची साथ कधी सोडली नाही.आणि याला कारण होते फक्त आणि फक्त आमदार भारत भालके हे सामान्य जनतेला देत असलेला सन्मान,प्रत्येकी कार्यकर्त्याच्या अडचणी सोडविण्यासाठी करीत असलेले प्रामाणिक प्रयत्न.आणि त्यामुळेच पंढरपूर शहरात स्व.भारत भालके हेच पक्ष ठरले होते.मात्र त्यांच्या निधनाने ”नानांना एक फोन आणि काम फत्ते” अशी श्रद्धा असलेल्या सामान्य जनतेपासून ते आपल्या भागातील रहिवाशांचे प्रश्न सोडविण्याची तळमळ असलेला प्रत्येक कार्यकर्ता,स्व.भारत भालके यांच्या विशेष अघोषित सल्लागार मंडळात समावेश असलेला ज्येष्ठ व्यक्ती आणि समर्थक आजी-माजी-भावी नगरसेवक सारेच नियतीच्या धक्क्याने मुळातून हतबल झाले आहेत,अवाक झाले आहेत आणि निःशब्दही झाले आहेत.मात्र यातील बहुतांश लोकांची स्व.आमदार भारत भालके यांच्यावरील अढळ श्रद्धा आता त्यांचे पुत्र भगीरथ भालके यांच्या समर्थनाचा रूपाने व्यक्त होत असून याचेच उदाहरण म्हणजे आज भगीरथ भालके यांनी सक्रिय व्हावे,विधानसभेची पोटनिवडणूक लढवावी,विठ्ठल कारखान्याच्या चेअरमनपदाची धुरा सांभाळावी या साठी थेट सरकोली येथे जाऊन केलेला आग्रह हि होय.        
              आज सरकोली येथे जसे स्व.आमदार भारत भालके यांच्यावर श्रद्धा असलेले अनेक कार्यकर्ते दाखल झाले होते तसेच परिवारातील अनेक जेष्ठ,समर्थक आणि राष्ट्रवादी कॉग्रेसचे पदाधिकारीही होते.या ठिकाणी जमलेल्या कार्यकर्त्यामसोर आपली भावना व्यक्त करताना तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे गटनेते सुधीर धोत्रे,माजी नगरसेवक महंमद उस्ताद,महात्मा फुले समता परिसषदेचे अनिल अभंगराव,सागर यादव,धनंजय कोताळकर,मल्हार आर्मचे संतोष बंडगर,विशाल आर्वे,माजी नगरसेवक किरण घाडगे,श्रीकांत शिंदे,संजय बंदपट्टे यांच्यासह अनेक समर्थकांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.यावेळी पंढरपूरचे माजी नागराध्यक्ष व राष्ट्रवादी कॉग्रेसचे जेष्ठ नेते सुभाष भोसले यांनी उपस्थिताना अतिशय मोलाचे मार्गदर्शन करीत असतानाच तालुक्याच्या आतापर्यंतच्या राजकीय वाटचालीचा पट उलगडून सांगत सर्वसामान्य जनतेचा सन्मान आणि त्यांचे प्रश्न जागेवरच सोडविण्याचे कसब हे स्व.आमदार भारत नानांचे बलस्थान होते आणि याच सामान्य जनतेला आता भगीरथ भालके यांच्याकडून याच अपेक्षा असल्याचे सांगितले.व विठ्ठल कारखान्याबाबत आणि कारखान्याच्या पुढील घडामोडी बाबतीत पसरविण्यात येत असलेल्या अफवांना थारा देऊ नका असे आवाहन उपस्थितांना केले.       
                   २००७ मध्ये झालेल्या मतदार संघ पुनर्रचनेनंतर मंगळवेढा तालुका हा स्व.भारत भालके यांच्यासाठी अतिशय नवखा होता.२००९ च्या विधानसभेला मते मागावयास जाण्यापूर्वी या तालुकयातील सर्व सामान्य जनतेशी थेट संपर्क आणि आदराची,सन्मानाची वागणूक देण्याबरोबरच त्यांचा राजकीय गट,राजकीय इतिहास न पाहता अनेक कार्यकर्त्यांना जवळ करीत स्व.आमदार भारत भालके यांनी चमत्कार घडविला होता.त्यांच्या आकस्मिक निधनानंतर आता त्यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांच्याकडे या दोन्ही तालुक्यातील भालकेप्रेमी जेष्ठ नेते,समर्थक कार्यकर्ते आणि भारतनाना हाच आमचा पक्ष अशी राजकीय श्रद्धा बाळगणारे सामान्य नागिरक नानांचा पैतृक वारसा चालविण्याबरोबरच राजकीय वारसा सक्षमपणे व त्याच विचाराने चालवतील या अपेक्षेने पहात असल्याची भावना आज सरकोलीत उपस्थित असलेले समर्थक व्यक्त करीत असल्याचे दिसून आले.    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *