ताज्याघडामोडी

अभिजित पाटील यांनी घेतली राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट

          धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे भेट घेऊन त्यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले.यावेळी अभिजित पाटील यांनी शरद पवार यांना श्री विठ्ठलाची प्रतिमा भेट दिली.यावेळी पंढरपूर तालुक्याच्या हरितक्रांतीचे उगमस्थान असलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यबाबत चर्चा झाली असल्याचे समजते.    
        पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा राजवाडा समजला जाणाऱ्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यास आर्थिक अडचणीमुळे गतवर्षीचा गळीत हंगाम घेता आला नव्हता.राज्य सहकारी बँकेकडून वेळेवर कर्जपुरवठा न झाल्यामुळे तसेच वेळेत शासनाकडून थकहमी मिळाली नसल्यामुळे विठ्ठल सहकारी साखर कारखाना मोठ्या आर्थिक संकटात सापडला होता.मात्र राज्यात सत्तांतर होताच डिसेंबर २०१९ मध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखान्यास ६० कोटी रुपयांची थकहमी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला.मात्र या थकहमीस कारखान्याच्या संचालक मंडळाच्या वयक्तिक मालमत्ता तारण देण्याची अट घालण्यात आली.हि अट रद्द करावी यासाठी कारखान्याचे चेअरमन स्व.आ.भारत भालके यांनी शासन दरबारी पाठपुरावा केल्यानंतर एप्रिल २०२० मध्ये राज्य शासनाने थकहमी देतानाची हि अट काढून टाकली होती.व विठ्ठल सहकारी साखर कारखान्यास अर्थपुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला.     
     राज्य शासनाने राज्यातील साखर कारखान्यांना गळीत हंगाम सुरु करण्यासाठी २० ऑक्टोबर २०२० पासून परवानगी देत असतानाच ४९२ कोटी रुपयांच्या पूर्वहंगामी कर्जाच्या रकमेस देखील थकहमी दिली यामध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखान्यास २० कोटी रुपये इतके पूर्व हंगामी कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता.मात्र कायदेशीर आणि कागदोपत्री अडचणी यामुळे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरु करण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आणि अशातच स्व.आ. भारत भालके हे आपल्या प्रकृतीची पर्वा न करता यासाठी पाठपुरावा करीत असल्याचे दिसून आले होते. 
      विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा पंढरपूर तालुक्यातील उसउत्पादकांच्या अर्थकारणाशी मोठ्या प्रमाणात निगडित असल्याने गतवर्षी गळीत हंगाम बंद ठेवावा लागल्याने या कारखान्याच्या सभासदांची मोठी गोची झाली होती.अनेक ऊसउत्पादक सभासदांना सोलापूर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील साखर कारखान्यांना आपला ऊस गाळपास पाठविण्यासाठी धावपळ करावी लागली होती.त्याच बरोबर विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा पंढरपूर तालुक्याच्या राजकारणातही दुसरा ध्रुव समजला जातो.तालुक्याच्या राजकारणात गेल्या ४० वर्षात पक्ष महत्वाचा न समजता परिचारक सर्मथक गट आणि आण्णा गट व पुढे पांडुरंग परिवार व विठ्ठल परिवार हे दोन बलाढ्य राजकीय गट प्रभावशाली ठरले आहेत.आणि विधानसभेपासून ते ग्रामपंचायतीच्या निडवणूक देखील याच आधारावर होत आल्या असल्याचे पहावयास मिळाले.मात्र विठ्ठल सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणीत आल्यानंतर आपला हा गड मजबूत राहिला पाहिजे अशी अपेक्षा अनेक सभासद उघड तर अनेक सभासद खाजगीत व्यक्त करीत होते.   
     २५ फेब्रुवारी २०२१ मध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपत असल्यामुळे  या कारखान्याच्या निवडणुकीची चर्चा अगदी जून महिन्यापासूनच सुरु झाली होती.धाराशीव साखर कारखान्याचे उस्मानाबाद,नांदेड आणि नाशिक जिल्ह्यातील तिन्ही युनिट सक्षमपणे चालविण्याबरोबर विविध उद्योगाच्या माध्यमातून वाटचाल करीत असलेले अभिजित पाटील हे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत स्वतंत्र पॅनल उभा करणार अशी चर्चा गेल्या ५ महिन्यापासून होत आली होती.अभिजित पाटील हे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अनेक सभासदांच्या गाठीभेटी घेण्यासाठी तालुक्यातील विविध गावांचा दौरा करीत असल्याचेही दिसून आले आहे.मात्र या कारखान्याची निवडणूक ते लढविणार असल्याचे जाहीर भाष्य त्यांनी कधी केल्याचे ऐकवीत नाही.   
         स्व.आमदार भारत भालके यांच्या निधनाने विठ्ठल परिवारात एक फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे.पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील जनतेच्या प्रश्नासाठी स्व.आमदार भारत भालके यांनी केलेला संघर्ष आणि सर्वसामान्य जनतेला सन्मानाची वागणूक देत त्यांनी जनतेशी जोडलेली नाळ त्यांना पंढरपूर तालुक्याच्या इतिहासात अजरामर करून गेली आहे.मात्र विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा सभासदांचा राजवाडा आहे.या राजवाड्याचे वैभव अबाधित राहिले पाहिजे अशीच धारणा प्रत्येक सभादांची आहे आणि हा राजवाडा अबाधित ठेवण्यामध्ये राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा वरदहस्त लाभणे सर्वात महत्वाचे आहे.स्व.औदूंबआण्णा पाटील यांनी मोठ्या कष्टाने उभा केलेला हा कारखाना पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावा यासाठी शरद पवार यांची भूमिका महत्वाची ठरणार असून धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील आणि शरद पवार यांच्यात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याबाबत नक्की काय चर्चा झाली याची उत्सुकता संपूर्ण तालुक्याला लागली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *