Uncategorized

कॉलेजची संस्कृती,  शिक्षक वर्ग आणि महाविद्यालयाचे इन्फ्रास्ट्रक्चर पाहूनच प्रवेशाबाबत निर्णय घ्यावा : स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे

फेसबुक लाईव्हद्वारे प्राचार्य डॉ.रोंगे सरांनी  दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना केले बहुमोल मार्गदर्शन!

 

पंढरपूर- ‘दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी व पालकांना प्रमुख प्रश्न पडतो की पुढे कोणत्या शिक्षणाला प्राधान्य द्यावे, जेणेकरून उत्तम करिअर होईल. माझ्या मते कोणतेही शिक्षण उत्तमच आहे परंतु त्या शिक्षणासाठी प्रवेश घेताना करिअर आणि ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्या महाविद्यालयाची संस्कृती, शिक्षकवर्ग आणि इन्फ्रास्ट्रक्चर पाहूनच प्रवेशाबाबत निर्णय घ्यावा.’ असे प्रतिपादन स्वेरीचे संस्थापक सचिव व इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी केले.

दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी विद्याभारती (पश्चिम महाराष्ट्र प्रांत) व स्वेरी यांच्या संयुक्त विद्यमाने फेसबुक लाईव्हद्वारे या मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आलेले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढील प्रवेशासंदर्भात विद्यार्थ्यांना घराबाहेर पडणे अडचणीचे झाले आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे बनलेले आहे. हा धागा पकडून राज्यातील शैक्षणिक विश्वात ‘पंढरपूर पॅटर्न’ द्वारा लक्षवेधी कामगिरी करत असलेल्या स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे सरांनी आज बहुमोल मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात प्रा. यशपाल खेडकर यांनी या  फेसबुक लाईव्ह सत्राच्या  आयोजनाबाबत थोडक्यात माहिती दिली. पुढे बोलताना प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांच्या  करिअरला योग्य दिशा द्यायची असेल तर मित्र, पुस्तक, मार्ग आणि विचार या चार महत्वपूर्ण गोष्टींची योग्य निवड केली पाहिजे. दहावीनंतर भरपूर पर्याय आहेत परंतु गोंधळून जाऊ नका. ज्या क्षेत्रात आवड नाही परंतु करिअर उत्तम घडते अशा क्षेत्राकडेही विशेष द्यावे. परंतु करिअर नसलेल्या क्षेत्रात आवड निर्माण करणे म्हणजे स्वतःची फसगत केल्यासारखेच आहे. प्रवेश कुठेही घ्या परंतु त्याची संपूर्ण माहिती अगोदर मिळवा. दहावीनंतर दोन प्रमुख पर्याय असून पहिला पर्याय म्हणजे पारंपारिक आर्टस्, कॉमर्स, सायन्स आणि व्होकेशनल या शाखांमधून शिक्षण घेऊ शकतो आणि दुसरे म्हणजे व्यावसायिक शिक्षण. यातून स्किल व नॉलेज यावर आधारित असलेल्या डिप्लोमा तसेच आय.टी.आय. मध्येही प्रवेश घेऊ शकतो. डिप्लोमा केल्यानंतर पुढे इंजिनिअरिंगच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळतो, नोकरी देखील करता येऊ शकते आणि उद्योगधंदाही सुरू करता येऊ शकतो. बारावी सायन्स केल्यानंतर इंजिनिअरिंग आणि मेडिकलकडे जाण्यासाठी पर्याय खुले होतात. परंतु मेडिकलला प्रवेश मिळण्याची शक्यता कमी असते. शिक्षण घेत असताना परिस्थितीचा बिलकुल बाऊ करू नये. परिस्थिती नसलेले विद्यार्थीच अधिक यशस्वी झालेले आहेत. हे इतिहास सांगत आहे. असे सांगून डॉ. रोंगे सरांनी विविध प्रवर्गांसाठी असणाऱ्या शिष्यवृत्ती व शैक्षणिक कर्ज या महत्त्वपूर्ण बाबींविषयी माहिती दिली. अभियांत्रिकी क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, सिव्हील इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग याविषयी विस्तृत माहिती दिली. तब्बल एक तासापेक्षा जास्त वेळ चाललेल्या या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून  राज्यभरातील अनेक विद्यार्थ्यांनी माहिती घेतली. एकूणच स्वतःमध्ये निर्माण होणारी इच्छाशक्ती प्रबळ असेल तर करिअर उत्तम घडू शकते असे डॉ.रोंगे सरांनी सांगितले. ज्यांना सदर लाईव्ह मार्गदर्शन पाहता आले नाही त्यांनी  स्वेरीच्या फेसबुक पेजला भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *