बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी लाच मागणाऱ्या महिला पोलीस उपनिरीक्षकाला अटक करण्यात आली आहे. तर 70 हजार रुपयांची रक्कम स्वीकारणारा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना धक्का देऊन पसार झाला. पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
तक्रार अर्जावरुन बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी पिंपरी चिंचवडमधील सांगवी पोलीस स्थानकातील महिला पोलिस उपनिरीक्षक आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांनी एक लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणी महिलेला अटक केली आहे. हेमा सिद्धराम सोळुंके असं अटक केलेल्या 28 वर्षीय पोलिस उपनिरीक्षक महिलेचे नाव आहे.
लाचेची 70 हजार रुपये रक्कम स्वीकारणारा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक बाळकृष्ण देसाई हा एसीबीच्या अधिकाऱ्यांना धक्का देऊन फरार झाला.आरोपी हेमा सोळुंके यांना ताब्यात घेत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात गुन्हा नोंद करण्यात आला.