ताज्याघडामोडी

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये निर्भया पथकाचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर येथे दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी निर्भया पथकाच्या वतीने विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला. महिलांच्या सुरक्षा बाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला होता. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
निर्भया पथकातील पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया रावण यांनी विद्यार्थिनींना त्यांच्या हक्कांविषयी, स्वसंरक्षणाच्या उपाययोजना, तसेच आपत्कालीन मदत कशी मिळवावी याबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने मुलींना त्रास देणे, छेडछाड करणे यांसारख्या प्रकारांमधून बचाव करण्याचे मार्गही यावेळी समजावून सांगण्यात आले. 
यावेळी पोलीस कॉन्स्टेबल निर्मला वाघमारे यांनी निर्भया पथकाचा मोबाईल नंबर देऊन कुठेही छेडछाड अथवा गैरप्रकार आढळल्यास विद्यार्थ्यांना कोणत्याही दबावाला बळी न पडता संपर्क करण्याचे आवाहन केले.  
निर्भया पथकाच्या या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढीस लागून पुढील अनेक गैरप्रकार रोखण्यास मदत होणार आहे असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी व्यक्त केले. 
श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त रोहन परिचारक यांनी या उपक्रमाचे कौतुक करून या विषयीचे महत्त्व अधोरेखित केले. महिला व बालविकास मंत्रालय भारत सरकार व महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशाप्रमाणे SHE-BOX व कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई व निवारण अधिनियम POSHACT २०१३ अन्वये जनजागृती होण्यासाठी महाविद्यालय स्तरावर सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी समुपदेशक डॉ. संगीता पाटील, निर्भया पथकातील कॉन्स्टेबल शशिकांत सावंत,लक्ष्मण कुचेकर,महाविद्यालयातील विभागाचे विभागप्रमुख डॉ. एस एम लंबे, डॉ. एस व्ही एकलारकर, डॉ. अनिल बाबर, प्रा. दीपक भोसले सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपप्राचार्य प्रा.जगदीश मुडेगावकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर प्रा.गायत्री सरदेशमुख यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *