सोलापूर जिल्ह्यातून विधान परिषदेसाठी राम सातपुते,बाळराजे पाटील यांचे नाव आघाडीवर
परिचारक यांनी तिरंगी लढतीत दोन पराभव पचवूनही बाळगलेल्या पक्षनिष्ठेची घेतली जाणार दखल
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्याने आता विधानपरिषदेतील अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या जागांवर निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे येत्या तीन महिन्यांत महाराष्ट्राला तब्बल 27 नवे आमदार मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून निवडणूक आयोगाकडून यासाठी चाचपणी सुरू आहे. याशिवाय, विधानसभेतील सदस्यांमधून निवडून द्यायच्या 9 जागांची मुदत 17 मे रोजी संपत आहे. त्यामुळे या जागांसाठीही लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. सध्याच्या राजकीय समीकरणानुसार महायुतीला बहुसंख्य जागा मिळण्याची शक्यता आहे.रणजितसिह मोहिते पाटील यांचाही विधान परिषदेचा कार्यकाळ संपला असून त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातून पुढील तीन महिन्यात २ आमदार विधान परिषदेवर जातील अशी शक्यता वर्तविली जात आहे.जिल्हा परिषद आणि नगर नगर पालिकांच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता सोलापूर जिल्ह्यातून स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून भाजप कुणाला संधी देणार याची मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.सोलापूर जिल्हा परिषदेत भाजपने ६८ पैकी ३८ जागा जिकंत सत्ता स्थापन केली आहे तर नगर पालिकांमध्येही भाजपच्या नगरसेवकाची संख्या मोठी असल्याने भाजपचा विजय सोपा मानला जात आहे.मात्र सोलापूर जिल्ह्यात भाजपकडून विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी अनेक नावे चर्चेत असून यात माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते,बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत,विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक, मोहोळ मतदार संघात दबदबा असलेले बाळराजे पाटील यांची नावे आघाडीवर आहेत.
मागील लोकसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्याचा समावेश असलेल्या सोलापूर व माढा या दोन्ही लोकसभा मतदार संघात भाजपचा पराभव झाला होता.सोलापूर लोकसभा मतदार संघातून भाजपचे उमेदवार राम सातपुते हे केवळ ७३ हजार च्या आसपास मतांनी पराभूत झाले होते.कॉग्रेसच्या विजयी खासदार प्रणिती शिंदे यांना मोहोळ विधानसभा मतदार संघातून ६५ हजार तर पंढरपूर विधानसभा मतदार संघातून ४५ हजार इतके मताधिक्य मिळाले होते.तर माढा लोकसभा मतदार संघातून विजयी झालेले शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना माढा विधानसभा क्षेत्रातून ५२ हजार तर माळशिरस तालुक्यातून देखील मोहिते पाटील यांना मोठे मताधिक्य मिळाले होते.अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी केंद्रात भाजपची स्वबळावर सत्ता असली पाहिजे असे भाजपचे धोरण आहे.मात्र २०२४ च्या निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळू शकले नाही,त्यामुळे २०२९ च्या निवडणुकीत २०२४ ला गमावलेल्या जागा पुन्हा जिकंण्यासाठी भाजपने रणनिती आखली असून त्याचाच भाग म्हणून सोलापूर आणि माढा लोकसभा मतदार संघात पुन्हा विजय संपादन करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातून विधान परिषदेची संधी कुणाला द्यायची याचा निर्णय भाजपकडून घेतला जाईल अशीच शक्यता व्यक्त केली जात आहे.
सोलापूर लोकसभा मतदार संघातील मोहोळ विधानसभा मतदार संघात भाजपची ताकत वाढली पाहिजे यासाठी विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थां मतदार संघातून माजी आमदार राजन पाटील अथवा बाळराजे पाटील यांचा संधी मिळू शकते तर माढा लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील यांच्या होम ग्राउंडवर राम सातपुते यांची आक्रमक वाटचाल,थोडक्या मतांनी विधासभेला झालेला त्यांचा पराभव आणि आता माढ्यातील रणजित शिंदे भाजपात आल्यानंतर बदललेली राजकीय परीस्थित पाहता रणजितसिह मोहिते पाटील यांच्या जागी विधानसभेतून विधान परिषदेवर नियुक्त होणाऱ्या जागेवर राम सातपुते यांना संधी मिळू शकते अशीही शक्यता वर्तविली जात आहे. बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्याही नावाची चर्चा होत असली तरी राजेंद्र राऊत हे विधानसभा निवडणुकीत विजय संपादन करून विधिमंडळात जाण्यासाठी आग्रही असल्याचे म्हटले जात आले आहे.
पंढरपूर-मंगळवेढा तालुक्याच्या राजकारणात माजी आमदार प्रशांत परिचारक हे २०१३ पासून भाजपशी जोडले गेले आहेत.२०१४ मध्ये त्यांना भाजपच्या मित्रपक्षांच्या माध्यमातून उमेदवारीही देण्यात आली होती मात्र शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विद्यमान आमदार समाधान आवताडे यांची उमेदवारी परिचारक यांच्या विजयात अडथळा ठरली.अवघ्या साडेआठ हजारांच्या आसपास मतांनी प्रशांत परिचारक हे पराभूत झाले.समाधान आवताडे यांना पंढरपूर शहर व २२ गावातून अगदी नगण्य मते मिळाली पण मंगळवेढ्यात त्यांना मिळालेली मते परिचारक यांच्यासाठी निकाल बदलणारी ठरली.तर पुढे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार म्हणून थेट स्वतः स्वर्गीय माजी आमदार सुधाकरपंत परिचारक मैदानात उतरले.राज्यच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात राजकारणातील देवमाणूस अशी त्यांची ख्याती होती.२०१४ पासून राज्यात महायुतीची सत्ता होती आणि अनेक मोठं मोठी कामे करणारे आवताडे हे मोठे मालक निवडणूक लढवीत असताना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करणार नाहीत असाच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा आणि स्थानिक नेत्यांचा अंदाज होता मात्र तो अंदाज खोटा ठरवत पुन्हा समाधान आवताडे हे निवडणुकीच्या मैदानात उतरले अन मोठ्या फरकाने पराभूत झाले.पण आवताडेंच्या पराभवापेक्षा २५ वर्षे आमदार राहिलेल्या स्वर्गीय माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या पराभवाची राज्यात मोठी चर्चा झाली.हा पराभव भाजपच्या देखील जिव्हारी लागल्याचे म्हटले गेले.पुढे नोव्हेंबर २०२० मध्ये आमदार भारतनाना भालके यांचे निधन झाले.आणि मे २०२१ च्या पोटनिवडणुकीत भाजपने प्रशांत परिचारक यांच्या ऐवजी आवताडे यांना उमेदवारी दिली.१२ वर्षानंतर या विधानसभा मतदार संघात झालेल्या दुरंगी लढतीवेळी भाजपचे अधिकृत उमेदवार असल्याने आवताडे यांना परिचारक यांची साथ मिळाली आणि अवघ्या ३७०० मतांनी का होईना आवताडे आमदार झाले.पुढे २०२४ मध्ये पार पडलेल्या विधानभेच्या सार्वत्रिक निवडणुकीवेळी भाजपच्या उमेदवारी साठी माजी आमदार प्रशांत परिचारक आणि त्यांचे समर्थक प्रचंड आग्रही असल्याचे दिसून आले होते.
२०१३ पासूनचा पक्ष निष्ठेचा,२०१४ आणि त्याहून जास्त जिव्हारी लागलेला २०१९ चा पराभव बाजूला सारत २१ च्या पोटनिवडणुकीत मागील दोन्ही पराभवात प्रभावी कारण ठरलेल्या आमदार आवताडेंचा प्रचार आम्ही केला आता आम्हाला संधी मिळावी अशी त्यांची रास्त भावना होती.परंतु दखल घेतली गेली नव्हती.उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्यात प्रदेशाध्यक्ष बावनकुळे पंढरीत आले आणि त्यांनी परिचारक यांना आश्वासन देत माघार घेण्यास भाग पाडले.२०२४ ची निवडणूक चौरंगी झाली.शरद पवार गटाने स्वतंत्र उमेदवार दिला आणि मोहिते पाटील यांनी त्या उमेदवाराचा प्रचार केला.या मतदार संघात मोहिते पाटील यांच्या प्रभावाखालील हजारो मतदार आहेत तर उमेदवार अनिल सावंत हे साखर कारखानदार,तर मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे हे कधीकाळी भालके समर्थक राहिलेले.त्यामुळे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीवेळी झालेल्या चौरंगी लढतीत आमदार आवताडे हे पुन्हा साडेआठ हजारच्या आसपास मताधिक्याने विजयी झाले.त्यामुळे भाजपचे वरिष्ठ नेते हे माजी आमदार प्रशांत परिचारक यांना २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपची उमेदवारी देण्यासाठी आग्रही असून भाजपचे आमदार समाधान आवताडे यांच्या भाजप निष्ठेच्या कालावधी पेक्षा परिचारक यांचा भाजप निष्ठेचा कालावधी जास्त आहे.विधानसभेचे दोन मोठे पराभव त्यांनी पचवले आहेत पण भाजप निष्ठा सोडली नाही.तर परिचारक यांची साथ मिळाल्याने आमदार आवताडे हे दोन वेळा विजयी झाले आहेत.याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही हे लक्षात घेत माजी आमदार प्रशांत परिचारक यांना दुसऱ्यांदा विधान परिषदेवर पाठविण्या ऐवजी २०२९ च्या विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून विद्यमान आमदार आवताडे यांच्या साथीने परिचारक यांना पहिल्यांदाच विधासभेवर संधी मिळावी आणि परिचारक हे जनतेतून निवडणून येऊ शकत नाहीत हि त्यांच्यावर जातीय समीकरणाच्या माध्यमातून होणारी टीका विद्यमान आमदार आवताडे यांच्या पाठबळाने पुसून टाकावी यासाठी भाजपचे वरिष्ठ आग्रही असल्याची चर्चा आहे.त्यामुळे पुढील तीन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्था अथवा विधासभेतून विधान परिषदेवर नियुक्त होणाऱ्या सदस्यांच्या निवडणुकीत कदाचित परिचारक यांचे नाव बाजूला ठेवले जाईल अशीच शक्यता वर्तविली जात आहे.
-राजकुमार शहापूरकर
(संपादक पंढरी वार्ता न्यूज नेटवर्क )






