पंढरपूर- राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त स्वेरीमध्ये‘नो प्रायव्हेट व्हेईकल डे’ साजरा करण्यात आला. या उपक्रमांतर्गत स्वेरी संचालित इंजिनिअरिंग व फार्मसीच्या पदवी व पदविका तसेच एमसीए व एमबीए या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या वाहनांना एक दिवस सुट्टी दिली. स्वेरीच्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे व प्रा. पूजा रोंगे हे ‘नो प्रायव्हेट व्हेईकल डे’ असल्यामुळे गेंड वस्तीपासून ते ठाकरे चौकापर्यंत चालत आले. तेथून स्वेरी कॉलेज पर्यंत बोलेरो या वाहनाने आले. डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी.मिसाळ व त्यांचे इतर प्राध्यापक वर्ग सायकलवरून, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. एम.जी.मणियार, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा.सतीश मांडवे, रजिस्ट्रार राजेंद्र झरकर व इतर प्राध्यापक हे एस.टी. ने कॉलेजला आले. तर स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम. पवार व उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार हे ऑटो रिक्षाने महाविद्यालयात पोहोचले. एकूणच स्वेरीचे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारीसहित सर्व स्टाफ यांनी स्वतःच्या वाहनाला सुट्टी दिली होती. यामुळे स्वेरी कॅम्पस मध्ये देखील वाहनांची वर्दळ नव्हती. यामध्ये काही प्राध्यापक रिक्षा, बस आदी वाहनांनी तर कांही प्राध्यापक चक्क चालत कॉलेजला आले. प्राध्यापक वर्ग बसमधून, सायकल वरून कॉलेजच्या प्रवेश द्वाराजवळ येताच विद्यार्थी गुलाब पुष्प देवून त्यांचे स्वागत करत होते. एकूणच दर वर्षीप्रमाणे यंदाही ‘नो प्रायव्हेट व्हेईकल डे’ यशस्वीरित्या साजरा करण्यात आला. स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील मेसा (मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडन्ट असोसिएशन) मधील विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने हा एकदिवसीय ‘नो प्रायव्हेट व्हेईकल डे’ साजरा केला. या उपक्रमाचे पंढरपूर परिसरात व सर्वत्र कौतुक होत आहे.