ताज्याघडामोडी

कंफर्ट झोन सोडून काम केल्याशिवाय यश अशक्य – व्यवस्थापकीय संचालक डॉ. नागेंद्र कोंडेकर स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये ‘राष्ट्रीय फार्मासिस्ट सप्ताह’ उत्साहात साजरा

पंढरपूर- ‘फार्मासिस्ट हे केवळ औषधांमध्येच तज्ञ नसतात तर ते आरोग्य सेवा प्रणालीचे महत्त्वाचे आधारस्तंभ असतात. त्यांचे काम केवळ औषधे देणे हे नसून रुग्णांना त्यांच्या आरोग्याबाबत जागृत राहून त्यांचे आरोग्य कसे उत्तम राहील यासाठी मार्गदर्शन करणे हे होय. यासाठी वेळोवेळी योग्य माहिती देवून त्यांना उर्जित करणे, औषधांच्या योग्य वापराबाबत जागरूक करणे, आरोग्य शिक्षण देणे हे महत्त्वाचे आहे. जागतिक आरोग्यविषयक गरजा पूर्ण करण्यात फार्मासिस्टचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. एकूणच फार्मासिस्ट ना मर्यादेबाहेर जावून कार्य करणे आवश्यक आहे. म्हणजे कंफर्ट झोन सोडून काम केल्याशिवाय कार्यात यश मिळणे अशक्य आहे’ असे प्रतिपादन विकल्प केम. टेक. प्रायव्हेट. लिमिटेड. (जि. सोलापूर) चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. नागेंद्र कोंडेकर यांनी केले.
       गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये ‘राष्ट्रीय फार्मासिस्ट सप्ताह’ उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी विकल्प केम. टेक. प्रा. लिमिटेड (जि. सोलापूर) चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. नागेंद्र कोंडेकर हे मार्गदर्शन करत होते. स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राचार्य डॉ. मिथुन मणियार यांच्या नेतृत्वाखाली दि. २३ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर, २०२४ या कालावधीत या सप्ताहाचे आयोजन केले होते. या सप्ताहानिमित्त कॉलेज मध्ये वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन केले होते. यामध्ये मेडिकल डिटेलिंग, फार्मस्यूटीकल मॉडेल प्रेझेंटेशन, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, ऍनिमेशन व्हिडिओ स्पर्धा, पोस्टर प्रेझेंटेशन, प्रश्नमंजुषा, वादविवाद स्पर्धा, रांगोळी आणि मेहंदी या स्पर्धांचा समावेश होता तसेच क्रीडा प्रकारांमध्ये कॅरम आणि बुद्धिबळ या स्पर्धा देखील घेण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. या सप्ताहामध्ये सलग तीन दिवस घेण्यात आलेल्या विविध स्पर्धामध्ये विजेता आणि उपविजेता निवडण्यात आले. प्रत्येक वर्षी दि.२५ सप्टेंबर रोजी ‘जागतिक फार्मासिस्ट दिवस’ साजरा केला जातो. फार्मासिस्टचे योगदान ओळखणे आणि त्यांच्या कार्यास प्रोत्साहन देणे हा त्याचा उद्देश आहे. जागतिक फार्मासिस्ट दिन हा दरवर्षी नवीन थीमसह साजरा केला जातो. सकाळच्या सत्रामध्ये पंढरपूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन आणि स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसी, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य ‘मोटार सायकल रॅली’चे आयोजन केले होते. ‘जागतिक फार्मासिस्ट दिवस’ निमित्त विद्यार्थी प्राध्यापकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पुष्प गुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. मणियार म्हणाले की, ‘२०२४ मध्ये या दिवसाची थीम  ‘फार्मासिस्ट: मिटिंग ग्लोबल हेल्थ नीड्स’ ही असून जी फार्मासिस्टच्या भूमिकेला एक नवीन दिशा देते. आरोग्य शिक्षणात फार्मासिस्टचे महत्त्वाचे कार्य आरोग्य शिक्षण देणे आहे. ते रुग्णांना त्यांच्या आरोग्याबाबत जागरूक करण्यास मदत करतात. औषधांचा योग्य वापर, त्यांची मात्रा, डोस आणि संभाव्य दुष्परिणामांविषयी माहिती देणे ही फार्मासिस्टची मुख्य जबाबदारी आहे. अशा प्रकारे ते रुग्णांना सक्षम करतात, त्यांना त्यांच्या आरोग्यासाठी चांगले निर्णय घेण्याची परवानगी देतात’ असे सांगून औषध निर्माण क्षेत्रातील अनुभव व्यक्त केले. जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्ताने आलेले प्रमुख पाहुणे डॉ. नागेंद्र कोंडेकर आणि डॉ. नामदेव वठमुर्गी यांनी मार्गदर्शन केले. डॉ. नागेंद्र कोंडेकर व डॉ. नामदेव वठमुर्गी हे दोघेही विकल्प केम. टेक. प्रायव्हेट लिमिटेड (जि. सोलापूर) चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहेत. या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना डॉ. नामदेव वठमुर्गी यांनी फार्मसी मध्ये रसायनशास्त्राचे योगदान, त्यांचा जीवन प्रवास, कंपनीबद्दल माहिती, कंपनी स्थापनेपासून ते आत्तापर्यंतची वाटचाल सांगून ड्रग संशोधनामध्ये आपल्याकडे कोणती कौशल्ये असली पाहिजेत, स्टार्ट अप कशापद्धतीने करावा, त्यासाठी आर्थिक नियोजन कसे असावे, काम करताना कार्यप्रणाली कशी असावी, संशोधनाचे महत्व, संशोधनात येणाऱ्या अडचणी व त्यांचे नियोजन, याबद्दल महत्वपूर्ण माहिती देवून  स्वेरीच्या शिस्तीचे कौतुक केले. राष्ट्रीय फार्मसी सप्ताह अंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धांच्या विजेत्या आणि उपविजेत्या स्पर्धकांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी पंढरपूर तालुका केमीस्ट अँड ड्रगीस्ट असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत खलिपे, स्वेरी कॉलेज ऑफ फार्मसी चे सांस्कृतिक कार्यक्रमाचे विभागप्रमुख प्रा. विशाल वाघमारे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा. प्रदीप जाधव, डॉ.वृणाल मोरे, डॉ. प्राजक्ता खुळे, प्रा. सुशांत धांडोरे, प्रा. वैभव गायकवाड, प्रा. ऋषिकेश शेळके, प्रा.स्नेहल पाटील, प्रा. लताताई पाटील, प्रा. संध्या गुजरे, प्रा. महादेवी भोसले यांच्यासह इतर प्राध्यापक उपस्थित होते. यावेळी विविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन प्रा. हेमंत बनसोडे, दीपाली सागडे व निकिता चव्हाण यांनी केले तर व विद्यार्थिनी समृद्धी सुरवसे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *