राजस्थानमधील बिकानेर येथील लष्करी तळावर एका पाकिस्तानी गुप्तहेराला पकडण्यात आलं आहे. हा पाकिस्तानी गुप्तहेर दुसरा कोणी नसून लष्कराच्या कॅन्टीनचा संचालक विक्रम सिंग आहे. विक्रम काही दिवसांपासून एका पाकिस्तानी महिलेच्या संपर्कात होता.
ही महिला दिसायला अतिशय संपर्कात होती. विक्रम तिच्या सौंदर्याने आकर्षित झाला. तिच्या प्रेमापोटी विक्रमने देशाची गुप्त आणि संवेदनशील माहिती तिच्यासोबत शेअर करण्यास सुरुवात केली. राजस्थान इंटेलिजन्सला याची माहिती मिळाली. त्यानंतर आर्मी इंटेलिजन्सच्या मदतीने या गुप्तहेराला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विक्रम हा बिकानेरच्या डुंगरगड तहसीलमधील लाखासर भागातील बस या गावचा रहिवासी आहे. त्याच्याकडे महाजन आर्मी परिसरातील कॅन्टीनचे कंत्राट होते. तो लष्कराच्या परिसरात कॅन्टीन चालवायचा. संधी पाहून लष्कराच्या परिसरातून संवेदनशील फोटो आणि कागदपत्रे काढून पाकिस्तानी हँडलरकडे पाठवत होता. राजस्थान इंटेलिजन्स टीमने त्याच्या संभाषणाचा मागोवा घेतला, तेव्हा ही बाब समोर आली.
राजस्थान इंटेलिजन्सने ही संपूर्ण घटना मिलिटरी इंटेलिजन्स बिकानेरला शेअर केली. त्यानंतर संयुक्त कारवाईत या गुप्तहेराला रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. अटकेच्या वेळी तो एका पाकिस्तानी महिलेला काही छायाचित्रे पाठवण्याचा प्रयत्न करत होता. राजस्थान इंटेलिजन्सचे अतिरिक्त महासंचालक संजय अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रमचा मोबाईल अनेक दिवसांपासून ट्रॅक केला जात होता. त्याच्या फोनवरचे सगळे संभाषण त्यांना ऐकू येत होते.
यावेळी पाकिस्तानी महिलेसोबतचं त्याचं संभाषण रेकॉर्ड करण्यात आलंय. यावेळी आरोपी हनीट्रॅपचा बळी असल्याचं उघड झालं. त्याला हनीट्रॅपचा बळी बनवणाऱ्या पाकिस्तानी महिलेने त्याला गुप्तचर माहिती काढण्याचं प्रशिक्षणही दिलं होतं. आरोपी विक्रमला अटक केल्यानंतर त्याची गंभीरपणे चौकशी केली असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या.