काही दिवसांपूर्वी घटस्फोट झालेल्या पत्नीचा पतीने गोळी झाडून खून केल्याची धक्कादायक घटना नेरळमध्ये घडली. भररस्त्यात घटस्फोटीत पतीने पत्नीवर गोळीबार केला. मंगळवारी दुपारी घडलेल्या या घटनेत पत्नी जागीच मृत्यूमुखी पडली. गोळीबारानंतर पती घटनास्थळावरून फरार झाला. या प्रकरणी कर्जत पोलिसात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास केला जात आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, कर्जत नेवाळी इथल्या चंद्रकांत सखाराम वाघमारे यांचे खांडपे आदिवासीवाडी इथल्या धोंडी चंदा वाघमारे यांच्याशी लग्न झालं होतं. कौटुंबिक वादातून त्यांनी घटस्फोट घेतला होता. पण घटस्फोटानंतरही त्यांच्यात वाद सुरू होते. चंद्रकांत पत्नी धोंडी हिला त्रास दे होता. दोघांमधील वाद मिटवण्यासाठी एका नेत्याच्या घरी बैठकही घेतली होती.
नेत्याच्या घरी बैठकीतसुद्धा हा वाद मिटला नाही. तेव्हा चंद्रकांत तिथून निघून गेला. त्यानंतर आडीवली – सांगवी रस्त्यावर तो वाटेतच बंदूक घेऊन उभा राहिला. समोरून पत्नी तिच्या भावासोबत गाडीवरून येताना दिसताच तो बंदूक घेऊन अंगावर धावून गेला. यावेळी गाडी रस्त्याच्या बाजूला उलटली आणि चंद्रकांतची पत्नी रस्त्यावर पडली. शिकारीसाठी वापरण्यात येणाऱ्या बंदुकीतून चंद्रकांतने पत्नी धोंडी हिच्यावर गोळीबार केला. यात धोंडी हिचा जागीच मृत्यू झाला.
पतीने पत्नीवर गोळीबार केल्यानंतर तिचा जागीच मृत्यू झाला. कर्जत पोलिसात हत्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले. त्यांनी आरोपीला शोधण्यासाठी पथके रवाना केली आहे. हत्येचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास केला जात आहे.