गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

चक्क SBI बँकेची बनावट शाखा काढली, 3 महिने चालवली, अधिकारीही चक्रावले

तुमच्या घराजवळ नव्यानेच उघडलेल्या बँकेच्या शाखेत तुम्ही अकाउंट उघडलंय. तुमचे आर्थिक व्यवहारही तुम्ही तिथे करताय. पण ती शाखाच बनावट असल्याचं कळलं तर तुमचं काय होईल? पायाखालची जमीन सरकेल? गुन्हेगार एखादा गुन्हा करण्यासाठी आपलं डोकं कुठल्या मर्यादेपर्यंत लढवतात याचा विचार केला तर सर्वसामान्य माणसाची मती गुंग होईल. अशा अनेक घटना गुन्हेगारी वर्तुळातून अधुनमधून समोर येत राहतात. नुकतीच तमिळनाडूमधून अशीच एक बातमी समोर आली आहे. तमिळनाडूत तिघांनी मिळून स्टेट बँकेची बनावट शाखा उघडल्याचं आणि ती थोडीथोडकी नव्हे तर तीन महिने चालवल्याचं समोर आलंय.

गेले तीन महिने तमिळनाडूमधील पत्रुती इथे स्टेट बँक ॲाफ इंडियाची ही बनावट शाखा सुरु होती. तमिळनाडू पोलिसांनी नुकतीच या प्रकरणात तीन आरोपींना अटक केली आहे. तिघांपैकी एक जण निवृत्त बँक कर्मचाऱ्याचा मुलगा असल्याचंही समोर आलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिन्ही आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. कमल बाबू हा या गुन्ह्याचा मास्टरमाईंड आहे. त्याचे आई-वडील दोघेही बँकेतून रिटायर्ड झाले आहेत. त्याच्या वडिलांचं दहा वर्षांपूर्वीच निधन झालं. आई दोन वर्षांपूर्वी एका बँकेतून रिटायर्ड झाली. या कटात सामील असलेला दुसरा आरोपी प्रिंटिग प्रेस चालवतो तर तिसऱ्याचा रबर स्टँप बनवण्याचा व्यवसाय आहे. बँकेशी संबंधित सगळी चलनं आणि कागदपत्र छापणं किंवा बँकेचे रबर स्टँप तयार करणं हे सगळं या तिघांच्याच वर्तुळात होत असल्यामुळे तीन महिने ही शाखा बनावट असल्याचं कुणाच्याही साधं लक्षातही आलं नाही.

तीन महिने या शाखेचा कारभार सुरळीत चालल्यानंतर गुन्हेगारांचा धीर चेपला. मात्र, चोरी उघडकीस आली ती मोठ्या रंजक पद्धतीने! या शाखेत येणाऱ्या ग्राहकाने आपली तक्रार खऱ्या एसबीआय शाखेच्या मॅनेजरकडे केली आणि खऱ्या शाखेचा मॅनेजरही गडबडून गेला. कारण आपल्या बँकेची अशी शाखा आहे हेच या मॅनेजरला माहीत नव्हतं. फक्त मॅनेजरच नाही तर झोनल ॲाफिसर्सही या शाखेबद्दल कळताच गडबडून गेले. गंमत म्हणजे ज्या भागात ही ब्रँच सुरु झाली त्या भागात एसबीआयच्या दोन शाखा आधीच अस्तित्वात आहेत. एसबीआय मॅनेजरलाही या दोन शाखाच माहिती होत्या. तिसऱ्या शाखेबद्दल कुठलीही कागदपत्रही एसबीआय व्यवस्थापनाकडे नव्हती. या शाखेबद्दल कळताच बँकेच्या अधिकाऱ्यांनी तिथे भेट दिली. हुबेहूब एसबीआय शाखेसारखी दिसणारी ही शाखा बघून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी या शाखेबद्दल पोलिसांना माहिती दिली आणि ही बाब उघडकीस आणली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *