गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

लाच घेणं पडलं महागात, महिला सरपंचासह नवरा अन् ग्रामसेवकाला रंगेहात पकडलं

नागपूर, हॉटेलच्या बांधकामासाठी ३५ हजारांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने महिला सरपंच, त्यांचे पती व ग्रामसेवकाला रंगेहात अटक केली आहे. कामठी तालुक्यातील खापा पाटण ग्रामपंचायतीत एसीबीने ही कारवाई केली. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ३९ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरुन ही कारवाई करण्यात आली आहे.

ग्रामसेवक दिलीप संतोषराव हेडाऊ (वय ४२ रा. झिंगाबाई टाकळी, नागपूर), सरपंच आशा मदन राजूरकर (वय ४९, त्यांचे पती मदन देवरावजी राजूरकर (वय ५८) अशी अटकेतील लाचखोरांची नावे आहेत. तक्रारदाराला दोन भूखंडावर हॉटेलची निर्मिती करायची आहे. यासाठी तक्रारदाराने ग्रामपंचायतीमध्ये कर पावती व हॉटेल बांधकामाकरिता नाहरकत प्रमाणपत्र मिळावे यासाठी अर्ज केला.

तिघांनी तक्रारदाराला ४० हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने एवढी रक्कम देण्यास असमर्थता दर्शविली. ३५ हजार रुपये दिल्याशिवाय नाहरकत प्रमाणपत्र मिळणार नाही, असे त्यांनी सांगितले. तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक राहुल माकणीकर यांच्याकडे तक्रार केली. माकणीकर अप्पर पोलिस अधीक्षक संजय पुरंदरे ,सचिन कदम, महिला निरीक्षक वर्षा मते, आशिष चौधरी त्यांचे सहकारी सुरेंद्र शिरसाट, अनिल बहिरे, कांचन गुलबासे, अमोल मेंघरे, वंदना नगराळे, प्रिया नेवारे यांनी सापळा रचून ग्रामसेवकाला लाच घेताना अटक केली. त्यानंतर सरपंच व त्यांच्या पतीला अटक करण्यात आली. तिघांविरुद्ध खापरखेडा पोलिस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *