ताज्याघडामोडी

दुर्दैवी! ५० वर्षे रुग्णसेवेतल्या डॉक्टरला आपल्याच रूग्णालयात व्हेंटिलेटर न मिळाल्याने मृत्यू

देशात कोरोनाबाधितांचा आकडा सतत वाढत असून अनेक रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, इंजेक्शन अभावी अनेक रुग्णांचा जीव जात आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी रुग्णालयांना दिवसागणिक कठीण होत आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये हीच परिस्थिती आहे. अशात मृत्यूनंतरही कोरोना रुग्णांचे हाल काही संपत नसल्याचे चित्र समोर येत आहे. दरम्यान अशीच काहीशा परिस्थितीचा सामना रुग्णांचे प्राण वाचवणाऱ्या डॉक्टरांनाही करावा लागत आहे. रुग्णांना गेली ५० वर्षे अविरतपणे सेवा देणाऱ्या डॉक्टरालाच कोरोना संसर्ग झाल्यानंतर बेड्स न मिळाल्याने जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना उत्तरप्रदेशातून समोर आली आहे.

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील स्वरुप राणी नेहरु रुग्णालयात ही घटना घडली असून डॉ. जे. के. मिश्रा असे ८५ वर्षीय मृत डॉक्टरांचे नाव आहे. डॉ. मिश्रा गेली अनेक वर्षे स्वरुप राणी नेहरु रुग्णालयात रुग्णांना सेवा देत आहेत. दरम्यान कोरोना काळातही त्यांनी अनेक रुग्णांची सेवा केली. मात्र १३ एप्रिलपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान त्यांचात कोरोनाची अनेक लक्षणेही दिसू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती अधिकच खालावली. यावेळी डॉक्टरांनी त्यांना व्हेंटिलेटर बेडवर हलविण्याचा सल्ला दिला. मात्र त्यावेळी रुग्णालयात एकही व्हेंटिलेटर बेड मिळाला नाही तसेच इतर रुग्णालयांमध्येही त्यांना तात्काळ बेड उपलब्ध झाला नाही.

याबाबत माहिती देताना रुग्णालयातील आपत्कालीन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, या रुग्णालयामध्ये १०० व्हेंटिलेटर बेड्स आहेत. परंतु कोरोना रुग्णांमुळे हे सर्व बेड्स डॉक्टरांना दाखल करण्याआधीपासूनच फूल्ल आहेत. त्यामुळे डॉ.मिश्रा यांना एकही व्हेंटिलेटर बेड मिळाला नाही. तसेच इतर रुग्णांना दुसऱ्या बेडवर हलविणे शक्य नव्हते. याच दरम्यान या रुग्णालयासह अन्य रुग्णालयांमध्ये बेड्स मिळतो का यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र अखेरपर्यंत त्यांना बेड मिळाला नाही. यात त्यांना व्हेंटिलेटर बेडची अधिक आवश्यकता होती मात्र होती मिळणे शक्य झाले नाही. परिणामी व्हेंटिलेटर न मिळाल्याने डॉ. मिश्रा यांना जीव गमवावा लागला.

डॉ. मिश्रा यांनी गेली 50 वर्षे वैद्यकीय क्षेत्रात रुग्णांची सेवा केली. यात ते अनेक वर्षे याच रुग्णालयात रुग्णसेवा देत होते. परंतु कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे डॉ. मिश्रांनाच मरेपर्यंत रुग्णालयात व्हेंटिलेटर बेड उपलब्ध होऊ शकला नाही आणि यात त्यांचा मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *