ताज्याघडामोडी

पंढरपूर परिसरातील गुंठामंत्री शासनाच्या आदेशामुळे टेन्शनमध्ये,ले आउट शिवाय गुंठेवारी दस्त नोंदणीची चौकशी होणार ?

२० गुंठे किंवा त्या पेक्षा कमी शेती क्षेत्र असेल तर अशा क्षेत्रातील जागेची गुंठेवारी पद्धतीने विक्री करण्यास राज्य शासनाने काही वर्षांपूवी मनाई केली होती.आता या बाबत शासनाने पुन्हा दिलेल्या निर्देशानुसार नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र यांनी गत महिन्यात गुंठेवारी व २ एकर पेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतजमिनीच्या खरेदी विक्री चा दस्त नोंदविण्याबाबत पुन्हा नव्याने आदेश काढले असून त्यानुसार जर एखाद्या शेतकऱ्याला बागायती जमीन विकायची असेल आणि खरेदी करायची असेल आणि जमीन 20 गुंठ्यापेक्षा कमी असेल तर खरेदी-विक्रीआधी परवानगीची गरज लागणार आहे. 2 एकराच्या गटातील जमीन गुंठेवारीने खरेदी-विक्री करता येणार नाही असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.राज्यभरात शहरा लगतच्या शेतजमिनीमध्ये ले आउट मंजुरी न घेता अनधिकृत रित्या गुंठेवारी पद्धतीने प्लॉट पाडून त्याची विक्री केली जात असल्याचे प्रकार वाढत चालले असून यातून मोठे वाद उत्पन्न होण्याबरोबरच कोट्यवधी रुपयांच्या मुद्रांक शुल्कावर मुद्रांक नोंदणी विभागास पाणी सोडावे लागले आहे.त्यामुळे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र यांनी विविध जिल्ह्यातील दस्त नोंदणी करणारे दुय्यम निबंधक कार्यालयात झालेल्या खरेदी विक्री व्यवहाराची चौकशी करून संबंधित दुययम निबंधकावर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरवात केली आहे.या बाबत पुणे जिल्ह्यात नुकतीच मोठी कारवाई झाल्याचे दिसून येते.
पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्याने पंढरपूर शहरात मठासाठी जागा खरेदी करण्याकडे विविध गावातील भाविक मंडळाचा ओढा असतो.त्याचीच परिणीती म्हणून पंढरपूर शहरालगत असलेल्या शेगाव दुमाला,देगाव,भटुंबरे,चिंचोली भोसे,गुरसाळे,आडीव विसावा,गोपाळपूर हद्दीत गेल्या काही वर्षात गुंठेवारी खरेदी विक्रीचे मोठे पेव फुटले आहे.पंढरपूर दुय्यम निबंधक क्रमांक २ मार्केट यार्ड या ठिकाणी गेल्या तीन वर्षात झालेल्या गुंठेवारी दस्त नोंदणीची चौकशी व्हावी अशी मागणी होत असून अनेक ठिकाणी गुंठेवारीचे व्यवहार करणाऱ्या काही दलालांनी या कार्यालयाच्या संगनमताने कुठलाही ले आउट नसताना गुंठेवारी खरेदी विक्रीचे दस्त नोंदवले आहेत काय याची चौकशी होणे गरजेचे झाले आहे.गुंठेवारी दस्त नोंदणीसाठी शेतकरी नसतानाही अनेकांनी सामूहिक शेतीच्या नावाखाली अवैध गुंठेवारी क्षेत्राची खरेदी अथवा विक्री केल्याची चर्चा असतानाच शासनाच्या आणि नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र यांनी निर्गमीत केलेल्या आदेशाची अमलबजावणी पंढरपूर  दुय्यम  निबंधक क्रमांक २ येथील दस्त नोंदणीची पडताळणी करण्यात यावी अशी मागणी नागिरकांमधून होत आहे.नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र यांनी गुंठेवारी खरेदी विक्री व्यवहारामुळे निर्माण होणाऱ्या समस्याबाबत न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेचीही माहिती आपल्या आदेशात दिली आहे.तर पंढरपूर परिसरात फोफावत चाललेल्या अस्ताव्यस्त गुंठेवारी व्यवहारास चाप बसावा व शहराचा चौफेर विस्तार होताना या ठिकाणी रस्ते,ड्रेनेज व्यवस्था व पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यास भविष्यात येणाऱ्या संभाव्य अडचणी लक्षात घेऊन काही नागिरक हायकोर्टात स्वतंत्र याचिका दाखल करण्याच्या तयारीत असल्याचे समजते.       
   

नोंदणी व मुंद्राक विभागाचा नेमका आदेश काय?

1) एखाद्या सर्व्हे नंबरचे क्षेत्र दोन एकर आहे. त्याच सर्व्हे नंबरमधील तुम्ही एक, दोन अथवा तीन गुंठे जागा विकत घेणार असेल, तर त्यांची दस्त नोंदणी होणार नाही. मात्र, त्याच सर्व्हे नंबरचा ‘ले-आउट’ करून त्यामध्ये एक, दोन गुंठयांचे तुकडे पाडून त्यास जिल्हाधिकारी किंवा सक्षम प्राधिकरणाची मंजुरी घेतली असेल तर अशा मान्य ले-आउट’ मधील एक, दोन गुंठे जमिनीच्या व्यवहाराची दस्त नोंदणी होऊ शकणार आहे.

2) यापुर्वीच ज्या पक्षकाराने प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी तुकडयाची खरेदी घेतली असेल, अशा तुकडयाच्या खरेदी विक्री व्यवहारासाठी सुध्दा महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा अधिनियम, 2015 कायदयातील कलम 8 नुसार सक्षम प्राधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांची परवानगी आवश्यक आहे.

3) एखादा अलहीदा निर्माण झालेल्या तुकडयाची शासन भुमी अभिलेख विभागामार्फत हददी निश्चित होऊन / मोजणी होवून त्याचा स्वतंत्र हदद निश्चितीचा मोजणी नकाशा देण्यात आला असेल अशा क्षेत्राचे विक्री करण्यासाठी परवानगीची आवश्यकता राहणार नाही. अशा स्वतंत्रपणे निर्माण झालेल्या तुकड्याच्या विभाजनास वरील अटी व शर्ती लागू रहातील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *