ताज्याघडामोडी

“अजित पवारांचा अपमान करण्यासाठी भाजपानं…”, पडळकरांच्या ‘त्या’ वक्तव्यावर सुप्रिया सुळे संतापल्या

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. ‘अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत,’ अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली होती. या वक्तव्यानंतर गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात अजित पवार यांचा गट आक्रमक झाला आहे. पडळकरांविरूद्ध राज्यात आंदोलनही करण्यात आली. यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपाला लक्ष्य केलं आहे.

“धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची भावना स्वच्छ नाही. म्हणून धनगर आरक्षणाबाबत अजित पवार यांना पत्र देण्याची गरज नाही. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत. अजित पवारांना आम्ही मानत नाही आणि कधी पत्रही दिलं नाही. पुढेही देण्याची आवश्यकता वाटत नाही. त्यामुळे ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळू शकतो, अशा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र दिलं आहे,” असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं.

यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “अजित पवार भाजपाबरोबर सत्तेत आहेत. सत्तेत असताना अजित पवार यांचा मित्रपक्ष त्यांच्याबद्दल अशी वक्तव्य करतो, हे अतिशय वाईट आहे. भाजपानं मोठ्या मनानं अजित पवारांना सत्तेत बरोबर घेतलं. पण, अजित पवारांचा अपमान करण्यासाठी बरोबर घेतलं का? याचं उत्तर भाजपानं दिलं पाहिजे.”

“मित्रपक्षाबद्दल बोलण्याची ही कुठली पद्धत आहे. हे दुर्दैवी आहे. हा अजित पवारांचा अपमान आहे,” अशी खंतही सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *