गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मैत्रिणीला मेसेज पाठवण्यावरुन वाद; त्याने श्रेयांशच्या हातातला चाकू हिसकावला अन् मग…

मैत्रिणीला मेसेज पाठविल्याच्या वादातून तरुण व त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांनी चाकूने वार करून २१ वर्षीय युवकाची हत्या केली. ही थरारक घटना गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास जरीपटका पोलिस स्टेशन हद्दीतील श्रावस्तीनगर परिसरात घडली. श्रेयांश शैलेश पाटील (रा. बाराखोली, इंदोरा), असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी मारेकरी अमित गणपत मेश्राम (रा. नारा) याला अटक केली आहे. श्रेयांश हा खासगी काम करायचा. अमितही खासगी काम करतो.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी पोलिसांनी अमित मेश्राम याच्याविरुद्ध प्रतिबंधक कारवाई केली. आठ दिवसांपूर्वी अमित याने श्रेयांशच्या मैत्रिणीला इन्स्टाग्रामवर फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठविली. त्यानंतर त्याने तिला मेसेज केला. याबाबत श्रेयांशला कळताच त्याने मैत्रिणीपासून दूर राहण्याबाबत अमितला इन्स्टाग्रामवरच बजावत धमकी दिली. त्यावर ‘तुझ्याकडून जे होते, ते कर’, असे अमित त्याला म्हणाला. गेल्या सहा दिवसांपासून दोघांमध्ये इन्स्टाग्रामवर हा वाद सुरू झाला.

गुरुवारी सकाळीही त्यांच्यात वाद झाला. यातच दोघांनीही एकमेकांना बघून घेण्याची धमकी दिली. अमित व त्याचे दोन अल्पवयीन साथीदार श्रावस्तीनगर परिसरात गेले. तेथील एका युवकाच्या माध्यमातून श्रेयांशला बोलाविले. श्रेयांश तेथे आला. त्याच्याजवळ चाकू होता, तर अमितच्या साथीदाराकडे रॉड होता. अमित व श्रेयांश या दोघांमध्ये वाद झाला. यातच श्रेयांशने चाकू काढताच अमितने त्याच्या हातातील चाकू हिसकावत त्याच्यावर वार केले, तर अन्य एकाने लोखंडी रॉडने श्रेयांशवर हल्ला केला. रक्ताच्या थारोळ्यात श्रेयांश खाली कोसळला. अमित व त्याचे साथीदार पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच जरीपटका व गुन्हेशाखा पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी श्रेयांशला मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. जरीपटका पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून अमितला अटक केली. अन्य दोघांना ताब्यात घेतले. नारा भागात अमितच्या वडिलांची कधीकाळी दहशत होती. त्याच्या वडिलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल आहे. आता अमितविरुद्धही हत्येचा गुन्हा दाखल झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *