ताज्याघडामोडी

आ.रोहित पवार यांच्यावर आणखी एक जबाबदारी; पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यात काम करण्याची संधी

कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची राज्य विधान मंडळाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवर नियुक्ती केली आहे. विधी मंडळ सचिवालयाने नुकतेच आमदार पवार यांना नियुक्ती पत्र दिले आहे. पवार यांची अलीकडेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यापाठोपाठ आता पुणे विद्यापीठाच्या सिनेटवर नियुक्ती झाल्याने त्यांचे राजकीय महत्व वाढत चालल्याचे दिसून येते.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे रोहित पवार यांना आता ही नवी जबाबदारी मिळाली आहे. रोहित पवार यांनी सरकारकडे वेळोवेळी विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडून ते सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढे ‘एमपीएससी’ची परीक्षा बहुपर्यायी न होता ‘युपीएससी’च्या धर्तीवर वर्णनात्मक पद्धतीने होणार आहे. परंतु हा निर्णय लगेचच लागू न करता २०२५ पासून लागू करण्याची विद्यार्थ्यांची मागणी होती आणि त्यासाठी हे विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. या प्रश्नी आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची व्यक्तीशः भेट घेऊन विद्यार्थ्यांची बाजू मांडली होती.

पुण्यात विश्रांतवाडी येथील बांधकाम पूर्ण झालेले शासकीय वसतीगृह तातडीने सुरु करण्याचा विषयावर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतील अडचणी दूर करण्याच्या विषयावरही त्यांनी आवाज उठवला आहे.

विविध पद भरती परिक्षेतील गोंधळ, पदवी आणि संबंधित अभ्यासक्रमाच्या तारखा, पदभरती, परिक्षा रद्द होणे, त्यातील चुकीच्या अटी, गोंधळ अशा अनेक विषयांवर पवार यांनी विद्यार्थ्यांच्या बाजूने आवाज उठवला आहे. आता सरकारने त्यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेटवर नियुक्ती केल्याने विद्यापीठाचे कार्यक्षेत्र असलेल्या पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यात काम करण्याची संधी त्यांना मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *