ताज्याघडामोडी

पोलिसांना खाकी वर्दीत मिरवणुकांमध्ये नाचण्यास मनाई; वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून निर्देश

काही दिवसांपूर्वी पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीत खाकी वर्दीतील पोलीस नाचल्यामुळे वादंग निर्माण झाला होता. पोलिसांची ही कृती योग्य होती किंवा नव्हती, यावरुन वादविवाद सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक कार्यालयाकडून महत्त्वाच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार पोलिसांना खाकी वर्दी घालून नाचण्यास मनाई करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक कुलवंत सरंगळ यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना याबाबत सक्त ताकीद दिली आहे. पोलिसांनी अशाप्रकारे खाकी वर्दीत मिरवणुकीत नाचणे हे अवमानकारक आहे. त्यामुळे पोलिसांनी अंगावर गणवेश असताना मिरवणुकीत नाचू नये, असे निर्देश कुलवंत सरंगळ यांनी दिले आहेत.

कोरोनाच्या दोन वर्षांच्या खंडामुळे यंदा गणेशोत्सव जोशात साजरा झाला होता. या काळात मिरवणुकांमध्ये पोलीस नाचतानाच्या जवळपास ५० व्हिडिओ क्लिप्स समोर आल्या होत्या. मुंबईतील जीएसबी सेवा मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीतही पोलीस नाचले होते. त्यानंतर या प्रकाराच्या अंतर्गत चौकशीचे आदेश देण्यात आले होते. यासंदर्भातील अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी मिरवणुकीत न नाचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलिसांनी खाकी वर्दी अंगावर असताना मिरवणुकांमध्ये नाचता कामा नये, त्यांना तशी परवानगी नाही. हे कृत्य अवमानकारक आणि अक्षम्य आहे, असे अतिरिक्त पोलीस महासंचालक कुलवंत सरंगळ यांनी म्हटले.

याशिवाय अनेक ठिकाणी पोलीस अधिकारी वैयक्तिक पातळीवर भाषण देतानाही दिसून आले होते. काही ठिकाणी पोलीस ढोल वाजवत होते. याची दखल पोलीस मुख्यालयाने दखल घेत पोलीस अधीक्षक स्तरावरील अधिकाऱ्याला याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर आता बंदोबस्ताला तैनात असताना अशा प्रकारे कोणत्याही धार्मिक अथवा सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी न होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *