धाराशिवमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते व धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अंगावर टिप्पर घालण्याचा प्रयत्न झाला आहे. ओमराजे हे सकाळी मॉर्निंग वॉकला जात असताना हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी टिप्परचालकाला ताब्यात घेतलं असून हा अपघात की घातपात? याची चौकशी पोलीस करीत आहेत. या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ओमराजे निंबाळकर हे नेहमीप्रमाणे आज सकाळी मॉर्निंग वॉकला निघाले होते.त्याचवेळी अचानक भरधाव वेगात एक टिप्पर आला. हा टिप्पर अंगावर येत असल्याचं पाहून ओमराजे यांनी रस्त्याच्या कडेला उडी मारली. त्यामुळे ते या अपघातातून थोडक्यात बचावले आहे. घटनेनंतर पोलिसांनी भरधाव टिप्परचा पाठलाग करत चालकाला ताब्यात घेतलं.
आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दुचाकीला ओव्हरटेक करण्याच्या नादात हा प्रकार घडल्याचं टिप्पर चालकाने पोलिसांना सांगितलं आहे. दरम्यान, मी सुखरूप असल्याची प्रतिक्रिया या अपघातानंतर ओमराजे निंबाळकर यांनी दिली आहे. घडलेला प्रकार हा अपघात आहे की घातपात? याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे.