अकोला जिल्ह्यातील दहीगाव गावंडे शेत शिवारात एका ४० वर्षीय विधवा महिलेचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला आहे. या महिलेच्या अंगावर चाकूने वार केल्याच्या जखमा दिसून आल्या आहेत. तिची हत्या केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. हा खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने अज्ञात आरोपींनी तिच्यावर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे.
संगीता राजू रवाळे असं या मृत महिलेचं नाव आहे. संगीता हिच्या पतीचं निधन झालं असून, तिला दोन मुले आहेत. गेल्या तीन चार वर्षांपासून ती माहेरी म्हणजेच अकोला जिल्ह्यतील बोरगांव मंजू पोलीस स्टेशन हद्दीतील दहीगाव गावंडे इथे राहत होती.
रविवार म्हणजे ४ जूनपासून संगीता ही गावातून बेपत्ता झाली होती. दरम्यान, मंगळवारी संध्याकाळी दहीगाव गावंडे येथील शेत शिवारात एका खड्ड्यात तिचा मृतदेह आढळून आला. मृतदेह काटेरी झुडुपात टाकलेला होता. मृतदेह हा अर्धवट जळालेल्या अवस्थेत असल्याने तिचा खून केल्याचा संशय घटनास्थळी वर्तविला जात होता.
या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, हत्या नेमकी कोण केली? का केली? याचा तपास सुरू आहे, ही हत्या अनैतिक संबंधातून झाल्याची चर्चा आहे. त्या दृष्टिकोनातून पोलिस तपास करीत आहेत. लवकरच यामागील आरोपींना गजाआड करण्यात येईल. बोरगाव मंजू पोलिस स्टेशन संजय खंदाडे हे म्हणाले.