ताज्याघडामोडी

गोव्यातून दारू आणणारा कंटेनर महाराष्ट्रात पलटला; रस्त्यावर बाटल्यांचा खच, पोलिसांची धावपळ

गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणारा कंटेनर तोरसे येथे अवघड वळणावर पलटी झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर घडला. अपघातानंतर कंटेनरमधील दारूच्या बाटल्या रस्त्यावर विखुरल्या होत्या. या अपघातात चालक व क्लिनर थोडक्यात बचावले. त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरून गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक होत असल्याचं वारंवार समोर आलं आहे. त्यातच आता दारूने खचाखच भरलेला कंटेनर पलटी झाल्यानंतर एका वाहनातून किती मोठ्या प्रमाणात दारू वाहतूक केली जाते, हे स्पष्ट झालं आहे. दरम्यान दारू वाहतूक करणार्‍या दोघांनाही गोवा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, संबंधित कंटेनरमधून गोवा बनावटीची दारू वाहतूक होत होती. ओव्हरलोड झाल्यामुळे तोरसे येथे अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटून कंटेनर रस्त्याच्या मधोमध डिव्हायडरवर पलटी झाला. अपघातानंतर आतील दारूच्या काही बाटल्या रस्त्यावर विखुरल्या गेल्या होत्या. अपघाताची तीव्रता लक्षात घेता चालक व क्लिनर बालंबाल बचावले. त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. दोघांनाही गोवा पोलिसांनी ताब्यात घेतलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *