ताज्याघडामोडी

आठवडाभरापासून शेतकरी बेपत्ता, अचानक मृतदेह सापडला; धक्कादायक कारण समोर

राज्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नुकतेच साताऱ्यातून हत्येचं एक प्रकरण समोर आलं आहे. फलटण तालुक्यातील डोंबाळवाडी येथून आठवडाभरापासून एक व्यक्ती बेपत्ता होता. त्याचा आता मृतदेह सापडला आहे. त्या व्यक्तीचा खून झाला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. लोणंद पोलिसांनी या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. सचिन धायगुडे असं मृत व्यक्तीचं नाव आहे. याबाबत लोणंद पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार २३ तारखेला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सचिन धायगुडे हा गुरांच्या धारा काढण्यासाठी शेतातील गोठ्यात गेला.

त्यानंतर रात्री आठ वाजल्यापासून तो बेपत्ता होता. त्याबाबतची फिर्याद लोणंद पोलीस ठाण्यात नितीन धायगुडे यांनी दाखल केली होती. या प्रकरणी मयत सचिन धायगुडे याचे नातेवाईक आणि लोणंद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी सहकाऱ्यांसह कसून शोध घेतला. आज बेपत्ता सचिन धायगुडे याचा मृतदेह कॅनॉलजवळील सार्वजनिक पाणी पुरवठा विहिरीत आढळून आला.

या प्रकरणी लोणंद पोलिसांनी राहुल नामदेव धायगुडे आणि प्रदीप दत्तात्रय टेंगले या दोन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर त्यांची कसून चौकशी करण्यात आली. शेतात सायफन पाईप टाकण्यावरून असलेल्या वादातून सचिन धायगुडे याचा गळा दाबून खून केल्याची कबुली त्यांनी दिली. हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह बंद असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठा विहिरीत टाकला. या घटनेचा पुढील तपास लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *