ताज्याघडामोडी

देशभरात पुन्हा रात्रीची संचारबंदी? ओमायक्रॉन च्या पार्श्वभूमीवर केंद्राचं राज्यांना पत्र

भारतात ओमायक्रॉनची प्रकरणे  झपाट्याने वाढत आहेत. केरळपासून जम्मू-काश्मीरपर्यंत देशातील 14 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचा प्रसार झाला आहे. मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमध्ये ओमायक्रॉनची 3 प्रकरणं समोर आली आहेत. दरम्यान, केंद्र सरकारने राज्यांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नाईट कर्फ्यूसारखी कठोर पावले उचलण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यासोबतच केंद्राने राज्यांना वॉर रूम सक्रिय करण्यास सांगितलं आहे.

केंद्रीय आरोग्य सचिवांनी वैज्ञानिक अहवालांच्या आधारे राज्यांना सांगितलं आहे, की ओमायक्रॉन कोरोनाच्या डेल्टा प्रकारापेक्षा तिप्पट जास्त संसर्गजन्य आहे. केंद्र सरकारनं म्हटले आहे की, भारतातील अनेक भागात अजूनही डेल्टा व्हेरिएंटची प्रकरणं समोर येत आहेत. अशा परिस्थितीत, स्थानिक आणि जिल्हा स्तरावर राज्य सरकारांनी दूरदृष्टी, डेटा विश्लेषणासह कठोर आणि त्वरित निर्णय घेणं आवश्यक आहे.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, चाचण्या आणि पाळत ठेवण्याबरोबरच नाईट कर्फ्यू लागू करणे, मोठ्या मेळाव्यावर बंदी घालणे, लग्न आणि अंत्यविधींमध्ये लोकांची संख्या मर्यादित करणे यासारखी पावले उचलली जावीत.

केंद्र सचिवांनी आपल्या पत्रात जिल्हा स्तरावर कंटेनमेंट झोन तयार करणे, कंटेनमेंट झोनची मर्यादा निश्चित करणे, प्रकरणांचा सातत्याने आढावा घेणे, रुग्णालयांमध्ये सुविधा वाढवणे यासारखी आवश्यक पावले उचलण्याचा सल्ला दिला आहे. केंद्राने पत्रात म्हटलं आहे की, अशा धोरणामुळे संसर्ग उर्वरित राज्यात पसरण्यापूर्वीच स्थानिक पातळीवर नियंत्रणात येईल.

आपल्या पत्रातून भूषण यांनी राज्यांना वॉर रूम, आपत्कालीन ऑपरेशन केंद्रे सक्रिय करण्यासही सांगितलं आहे. प्रकरणे कमी असली तरी जिल्हा आणि स्थानिक पातळीवर सक्रिय कारवाई करत रहा. क्षेत्रीय अधिकाऱ्यांसोबत नियमित आढावा घ्या. या उपायांमुळे संसर्ग कमी होण्यास नक्कीच मदत होईल, असंही ते म्हणाले.

मंगळवारी महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे 11 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 8 प्रकरणं मुंबई विमानतळावर चाचणीदरम्यान आढळून आली आहेत. तर उस्मानाबाद, नवी मुंबई आणि पिंपरी चिंचवडमध्ये तीन रुग्ण आढळले आहेत.

ओमायक्रॉन भारतातील 14 राज्यांमध्ये पसरला आहे. आतापर्यंत 220 हून अधिक प्रकरणं नोंदवली गेली आहेत. मुंबईत सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. इथे आतापर्यंत 65 जणांना कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण झाली आहे. दिल्लीत, एलएनजेपीमध्ये 34 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यातील 3 रुग्णांची ट्रॅव्हल हिस्ट्रीही नाही.

ओमायक्रॉनची वाढती प्रकरणे पाहता कर्नाटक सरकारने नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनवर बंदी घालण्याची घोषणा केली. कर्नाटकात नववर्षानिमित्त सामूहिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय रेस्टॉरंट आणि बारदेखील 50% क्षमतेने उघडू शकतील. डीजे पार्ट्याही होणार नाहीत. सरकार लवकरच सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे जारी करेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *