ताज्याघडामोडी

आशिष कुठेय? आई-वडील जीव तोडून धावले; लिफ्टच्या आत डोकावून पाहिले; लेकराचे पाय लटकत होते

पश्चिम दिल्लीतील विकासपुरीत एका पाच मजली इमारतीत नऊ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना २४ मार्चला घडली. लिफ्टच्या गेटमध्ये अडकल्यानं मुलाचा मृत्यू झाला. गेटमध्ये अडकल्यानं मुलगा गंभीर जखमी झाला होता. गेल्या आठवड्यात घडलेली ही घटना आता समोर आली आहे. मुलाचं नाव आशिष असं आहे. आशिष त्याच्या आई वडिलांसोबत सीतापुरीमध्ये राहायचा. त्याचे आई वडील लाँड्रीचं काम करतात.

शुक्रवारी सकाळी आशिष त्याची आई रेखासोबत इमारतीत राहणाऱ्यांकडून कपडे गोळा करण्यासाठी गेला. आई जिन्यानं वर गेली. तर आशिषनं लिफ्टचा मार्ग धरला. काही वेळानं रेखा दुकानात परतल्या. त्यांनी पती रमेश यांच्याकडे आशिषबद्दल विचारणा केली. त्यावर आशिष तुझ्या पाठोपाठच गेला होता, असं रमेश यांनी सांगितलं. यानंतर दोघेही जण इमारतीकडे धावले. त्यांनी तळमजल्यावर असलेल्या लिफ्टच्या सेफ्टी डोअरच्या लहानशा काचेच्या खिडकीतून डोकावून पाहिलं. तेव्हा त्यांना मुलाचे पाय लटकताना दिसले. याची माहिती दोघांनी वरच्या मजल्यावरील रहिवाशांना दिली.

तांत्रिक चुकीमुळे हा प्रकार घडल्याचा अंदाज पश्चिम दिल्लीचे पोलीस उपायुक्त घनश्याम बन्सल यांनी प्राथमिक तपासानंतर वर्तवला. मुलगा लिफ्टमध्ये शिरत असताना लिफ्ट अचानक सुरू झाली असावी. लिफ्टचं दार बंद झाल्यानं मुलगा मध्येच अडकला असावा, अशी शक्यता त्यांनी बोलून दाखवली.

इमारतीच्या रहिवाशांनी लिफ्टच्या देखभालीचं काम पाहणाऱ्या कर्मचाऱ्याला बोलावलं. त्यानं आशिषला बाहेर काढलं. आशिष जवळपास अर्धा तास लटकत होता. त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं. आशिषच्या अकाली निधनानं आई वडिलांना धक्का बसला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *